राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. शहर बस सेवा नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. शहर बस सेवेच्या एकूण ५६० बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व  विद्यार्थ्यांना बस थांब्यावर तासन-तास बससाठी प्रतीक्षा करावी लागते.  सध्या सुरु असलेल्या बसेसला गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येते. बससेवेअभावी प्रवाशांना खासगी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा उल्लेख देखील त्यांनी या पत्रामध्ये केलाय.

त्याचबरोबर एस.टी. महामंडळाने नाशिक शहरातील बस फेऱ्या कमी केल्यामुळे नादुरुस्त बसेसची संख्या वाढल्यामुळे काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांना सक्तीने रजेवर पाठवण्यात आले. २२ ऑगस्टला शहरात याचे पडसादही उमटले. कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बस सेवा बंद ठेवली होती. परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी असल्यामुळे नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन  शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत सुरु करण्यात याव्यात. तसेच शहरातील प्रवासी वेठीस धरले जात असल्यामुळे शहर बस सेवा सुरळीत होणे महत्वाचे आहे. त्यामुळे सदर सेवा महानगरपालिकेकडे वर्ग करणे  किंवा फेऱ्या पूर्ववत सुरु करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे असेही जाधव यांनी म्हटले आहे.