खबरदारी घेत आजपासून व्यवहार सुरू

नाशिक : शहरातील करोनाचा वाढता संसर्ग पाहता गर्दीवर नियंत्रणासाठी येथील सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आठ दिवस बाजार ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांमध्ये गैरसमज पसरतील, अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमात फिरविण्यात आल्याने बंद मागे घेऊन सराफ बाजार गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय नाशिक सराफ संघटनेने घेतला आहे.

सराफ बाजार संघटनेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन आजपर्यंत करण्यात आलेले आहे. ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटनेने कठोर पावले उचलली आहेत.

सामाजिक अंतर पथ्य, निर्जंतुकीकरण आदींची काटेकोर अंमलबजावणी करून तसेच सुरक्षिततेचे इतर उपाय योजून सराफ बाजारातील व्यवहार सुरू होते. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी न होता रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून संघटनेने पुन्हा एकदा सराफ बाजार ऐच्छिकरित्या बंद ठेवण्यासंदर्भात सभासदांना आवाहन केले होते. संघटनेच्या आवाहनास काही व्यावसायिकांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. परंतु, काही जणांनी समाज माध्यमातून गैरसमज निर्माण होतील, असे संदेश पसरविले गेल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

नाशिक सराफ बाजार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय हा व्यापाऱ्यांनी  ऐच्छिकरित्या घेतला होता. त्यामुळे सराफ बाजार संपूर्ण बंदच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. गर्दी टाळून सुरक्षित सोने खरेदीसाठी संघटनेने ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी पारंपरिक सराफाकडे ऑनलाइन नोंदणी करणे, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, व्हॉटसअप अशा माध्यमातून सोने खरेदी केली जाऊ शकते. नेहमीच्या सराफांनी सुरक्षिततेची सर्व काळजी घेवून घरपोच सेवा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे नाशिक सराफ संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी नमूद केले आहे.

आजपासून सराफ बाजार पूर्ववत

प्रशासनाला सहकार्य व्हावे या उद्देशाने आम्ही बाजार बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. परंतु, या बंदचा काही माध्यमातून आणि काही व्यक्तींकडून व्यक्तिगत फायद्यासाठी ग्राहकांमध्ये गैरसमज होतील, अशा पद्धतीने संदेश देण्यात येत आहेत. सराफ बाजार पूर्णपणे सुरक्षित असून आम्ही बंदचा निर्णय मागे घेत असून गुरुवारपासून सराफ बाजार प्रशासनाचे पूर्ण नियम पाळून सुरू होईल

– चेतन राजापूरकर

(अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन)