नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी फ्रान्समधील मानाची आणि अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन २०१८ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. फ्रान्सच्या विची शहरात ही स्पर्धा पार पडली. अंदाजे १ हजार ३०० स्पर्धकांनी या मानाच्या स्पर्धेत भाग घेतला होता, यामध्ये सर्वांना मागे टाकत सिंगल यांनी अव्वल स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे डॉ़ सिंगल यांनी स्पर्धेचा निर्धारीत वेळ १६ तासांऐवजी १५ तास १३ मिनिटांमध्येच ही स्पर्धा पुर्ण करून देशाची मान उंचावली़ आहे.
फ्रान्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. प्रत्येक स्पर्धकाला १६ तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये सर्वप्रथम ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर धावणे असे खडतर टप्पे असतात. डॉ. सिंगल यांनी १५ तास १३ मिनीटांमध्येच ही स्पर्धा जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे.
वयाच्या ५२ व्या वर्षी सिंगल यांनी मिळवलेलं हे यश नक्कीच वाखणण्याजोगं आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून सिंगल यांचं कौतुक केलं जात आहे. याआधी भारताकडून २०१५ साली प्रसिद्ध मॉडेल मिलींद सोमण, २०१७ साली विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी ही मानाची स्पर्धा पूर्ण केली आहे. डॉ़. सिंगल यांना नाशिकच्या स्पोर्ट्स मेड सेंटरमध्ये डॉ़पिंप्रिकर व डॉ़ मुस्तफा टोपीवाला यांनी प्रशिक्षण दिले़ आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 11:00 am