गणेशोत्सव, मोहरमनिमित्त सज्जतेचा संदेश

नाशिक : सर्वत्र करोनाचे संकट घोंघावत असताना संचारबंदी, टाळेबंदीच्या माध्यमातून यावर नियंत्रण आणण्यात प्रशासनासह पोलीस सक्रिय आहेत. यंत्रणा करोनाभोवती केंद्रित झालेली असताना आगामी गणेशोत्सव आणि मोहरमनिमित्त पोलिसांवरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. कोणत्याही संकटकालीन परिस्थितीत पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार असल्याचा संदेश देण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांच्या वतीने जुने नाशिक परिसरात रंगीत तालीम आणि पथ संचलन करण्यात आले.

सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दंगा नियंत्रण योजनेच्या माध्यमातून अतिसंवेदनशील भागात रंगीत तालीम के ली जाते. याअंतर्गत बुधवारी एखादा दूरध्वनी पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस किती वेळात घटनास्थळी दाखल होऊन प्रतिसाद देतात, याचा अंदाज घेण्यासाठी एक निनावी दूरध्वनी भद्रकाली पोलीस ठाण्यात करण्यात आला. या वेळी जुने नाशिक परिसरात नानावली येथील गुमशुदा बाबा दग्र्याजवळ दोन गटात दंगल झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार घटनास्थळावर पोलीस उपायुक्त अमोल तांबे, साहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, साहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव हे दाखल झाले. पोलीस कर्मचारी मात्र उशिराने पोहोचले. यामुळे तांबे यांनी संबंधितांना धारेवर धरत कडक शब्दांत समज दिली.

कुठल्याही दूरध्वनीवर पोलीस किती वेळात पोहोचतात आणि कसा प्रतिसाद देतात हे महत्वाचे आहे. केवळ घटनास्थळाला भेट देणे ही औपचारिकता नको. कामावर येताना मुखावरण, हातात काठय़ा, आवश्यक मनुष्यबळ पाहिजे. काम करतानाही काही अडचणी आल्या. याविषयी तांबे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले. रंगीत तालीमनंतर परिसरात पथ संचलन करण्यात आले.