नाशिक : ‘महावितरण’कडून पावसाळी कामे करण्यात येणार असल्याने गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

गंगापूर धरण परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात महावितरण कंपनीकडील १३२ केव्ही सातपूर आणि १३२ केव्ही महिंद्रा या दोन एक्सप्रेस फीडरवरून जॅकवेलसाठी ३३ केव्ही वीजपुरवठा कार्यान्वित आहे. या ठिकाणाहून शहरात पाणीपुरवठा होत असतो. गंगापूर रोड परिसरातील खतीब फार्म ते वास्तुरचनाशास्त्र महाविद्यालय या दरम्यान महावितरण कंपनीमार्फत केबल भूमिगत करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘महावितरण’ कंपनीने जोडणीचे काम गुरुवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत करण्याचे ठरविले असल्याने या काळात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच पाथर्डी फाटा येथे पाणीपुरवठा वितरण विभागात व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे गरजेचे असल्याने मुकणे धरण परिसरातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर गंगापूर धरण तसेच मुकणे धरण परिसरातून शहराला होणारा पाणीपुरवठा सकाळी आणि सायंकाळी होणार नाही. तसेच शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेचे अधीक्षक अभियंता यांनी दिली. ऐन पावसाळ्यातच महावितरणकडून दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुरुस्तीची कामे पावसाळ्याआधीच होणे आवश्यक असताना दरवर्षी या कामांना पावसाळ्यातच सुरुवात केली जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.