News Flash

करोनापश्चात रुग्णांसाठी महापालिके तर्फे  तपासणी व्यवस्था

या सर्व रुग्णांसाठी महानगरपालिकेने विभागनिहाय सहा रुग्णालयात बारुग्ण विभाग सुरू केला आहे.

नाशिक महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)

नाशिक : महानगरपालिका कार्यक्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. पण, करोना होऊन गेल्यानंतर काही रुग्णांना अंगदुखी, अशक्तपणा असा त्रास जाणवत आहे. काहींना म्युकरमायकोसिसची लागण झाली. या सर्व रुग्णांसाठी महानगरपालिकेने विभागनिहाय सहा रुग्णालयात बारुग्ण विभाग सुरू केला आहे. या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. संसर्गाचा वेग अधिक असल्याने कुटुंबच्या कुटुंब बाधित झाली. अनेकांना प्राण गमवावे लागले. जूनच्या प्रारंभी रुग्णांची संख्या कमी होत आहे. तथापि, करोनातून बरे झालेल्या रुग्णांना निरनिराळ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. काही रुग्णांना अंगदुखी तर काहींना अशक्तपणा जाणवतो. बरे झालेल्या रुग्णांना बोलतांना, चालतांना वा जिना चढतांना धाप लागणे असे त्रासही होत आहे. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काहींना बुरशीजन्य म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.

करोना पश्चात होणारा त्रास लक्षात घेऊन अशा रुग्णांसाठी महापालिकेने विभागनिहाय प्रत्येकी एक अशा सहा रुग्णालयात बारुग्ण विभाग सुरू करून तपासणीची व्यवस्था केली. प्रत्येक ठिकाणी एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पूर्व विभागात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय – डॉ. नितीन रावते, नाशिकरोड विभाग जेडीसी बिटको रुग्णालय – डॉ.शिल्पा काळे, पंचवटी विभागात इंदिरा गांधी रुग्णालय – डॉ. विजय देवकर, नवीन नाशिक विभागात श्री स्वामी समर्थ रुग्णालय – डॉ. नविन बाजी, सातपूर विभागात गंगापूर रुग्णालय – डॉ. योगेश कोशिरे, नाशिक पश्चिम विभागात जिजामाता रुग्णालय – डॉ. स्वाती सावंत हे काम पाहणार आहेत. या ठिकाणी करोना पश्चात बा रुग्ण विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. करोना उपचारानंतर काही त्रास असल्यास अथवा शंका असल्यास या ठिकाणी नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:25 am

Web Title: nashik civic body start post covid care centres zws 70
Next Stories
1 पाच स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई
2 मालेगावच्या वादग्रस्त रुग्णालयांविरुद्ध गुन्हा
3 बालकाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी
Just Now!
X