अस्वच्छता करणाऱ्यांच्या विरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई

नाशिक : शहरात स्वच्छता, कचरा संकलनाचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याने वारंवार टिकेचे धनी व्हावे लागणारी महापालिका अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर मात्र नियमितपणे कारवाई करत आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ६७९ जणांवर कारवाई करत सुमारे सव्वा सहा लाखाची दंड वसुली करण्यात आली. याच स्वरुपाची कारवाई नियमित स्वच्छतेची जबाबदारी पार न पाडणाऱ्या पालिकेच्या कामगारांवरही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री, वापर करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र कायम आहे. त्या अंतर्गत २५१ जणांकडून सुमारे १३ लाखाची दंड वसुली करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंचतारांकित मानांकन मिळवण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेंतर्गत पाहणीसाठी केंद्रीय पथक आले होते. स्पर्धेत वरचे स्थान मिळावे म्हणून खुद्द महापौरांनी दूरध्वनीद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावीत याची माहिती दिली होती. घराघरातील कचरा संकलनासाठी घंटागाडी व्यवस्था असली तरी त्याबद्दल समाधान वाटावे अशी स्थिती नाही. स्वच्छतेअभावी डिसेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची आकडेवारी आहे.

त्यानंतर पालिकेच्या यंत्रणेने युध्दपातळीवर मोहीम हाती घेतली. महापालिका कर्मचारी संपावेळी घंटागाडी कामगारही सहभागी झाल्याने घरोघरी कचरा पडून राहिला. सार्वजनिक स्वच्छतेचे काम योग्य पध्दतीने होत नसल्यावरून नगरसेवक, नागरिक वारंवार तक्रार करतात. स्वच्छता न होण्यात जशी पालिका यंत्रणा कारणीभूत आहे, तसेच अस्वच्छता वाढण्यास नागरिकांचा हातभार लागतो. मोकळी जागा पाहून कचरा फेकला जातो. कचरा संकलनासाठी घंटागाडी व्यवस्था असली तरी त्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यात धन्यता मानली जाते. नागरिकांप्रमाणे स्वच्छतेचे काम नियमितपणे न करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांवर पालिकेने अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अस्वच्छता वाढविण्यास कारक ठरलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे अस्त्र महापालिकेने उगारले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ६७९ जणांवर कारवाई करून सहा लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे सिडकोत अधिक नागरिक सापडले. या विभागात २४८ जणांवर कारवाई झाली. नाशिक पूर्वमध्ये अस्वच्छता करणारे सर्वात कमी म्हणजे १३ जण सापडले. पंचवटी विभागात ११७, नाशिकरोड विभागात १०६, नाशिक पश्चिम ५१, सातपूर विभागात १४४ जणांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक कारवाईतून १३ लाखाचा दंड

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि वापरही कायम असल्याचे महापालिकेच्या कारवाईवरून उघड होत आहे. या अंतर्गत सहा विभागात २५१ जणांवर कारवाई होऊन १२ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराची सर्वाधिक ५९ प्रकरणे सिडकोमध्ये तर सर्वात कमी १९ सातपूर विभागातील आहेत. नाशिकरोडमध्ये ५६, पंचवटी ४१, नाशिक पूर्व २२ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.