विरोधाला न जुमानता अनधिकृत मंदिराविरुद्धची कारवाई सुरू; परिसरात तणावपूर्ण शांतता

अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मठ मंदिर बचाव समितीसह अन्य संघटनांनी विरोध करीत बुधवारी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सिडको परिसरातून सुरुवात केली. या घडामोडींमुळे उपरोक्त परिसरात तणावपूर्ण शांतता कायम राहिली.

ज्यामुळे वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण होईल अशी रस्ता व रस्त्यालगत असलेले धार्मिक स्थळे  उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काढण्यास महापालिकेने दुसऱ्या टप्पात बुधवारी नवीन नाशिक परिसरातून सुरुवात केली. या मोहिमेला हिंदुत्ववादी संघटनांनी आधीच विरोध दर्शविला होता. त्या अनुषंगाने मंदिराचे व्यवस्थापन करणारे प्रतिनिधी आणि संबंधितांच्या शिष्टमंडळाने महापालिकेत धडक देऊन फेरसर्वेक्षणाची मागणी केली होती. हे फेरसर्वेक्षण होईपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई करू नये असे संबंधितांचे म्हणणे होते. या कारवाईच्या निषेधार्थ मंदिर बचाव समितीने बंदची हाक दिली. दरम्यानच्या काळात या कारवाईला स्थगिती मिळाल्याच्या अफवा समाजमाध्यमावर पसरल्या. परंतु, महापालिकेने त्याचे तातडीने खंडन केले. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेला सर्वसामान्यांसह काही धार्मिक संघटनांचा विरोध पाहता कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी, उपायुक्त व नगररचना कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांचा ताफा पोलीस बंदोबस्तात सिडको परिसरात दाखल झाला. यासाठी अंबड, सातपूर, इंदिरानगरचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली. नवीन नाशिक परिसरातील पेलिकन पार्क जवळील मांगीरबाबा मंदिराचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यानंतर हा ताफा तुळजाभवानी चौकाकडे रवाना झाला. तेथील दत्त मंदिराचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र हे अतिक्रमण हटविताना परिसरातील नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला. स्वत मंदिर काढण्याची तयारी दर्शविली. वातावरणातील तणाव जाणवताच पोलीसांनी हस्तक्षेप करत मोहिमेची सुत्र हाती घेतली. मात्र नागरिकांनी माघार घेत मोहिमेचा मार्ग खुला केला. बुधवारी झालेल्या मोहिमेत १० मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आली. अतिक्रमण मोहिमेत मंदिराचे अतिक्रमण काढताना त्या धार्मिक स्थळाचे विधिवत पूजन करतच अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. एरवी कुठल्याही आंदोलनात किंवा जनतेच्या प्रश्नांवर जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना पोलिसांनी आधीच ताकीद दिल्याने या मोहिमेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे नगरसेवकांनी टाळले.

दरम्यान, मठ मंदिर बचाव समितीच्या वतीने बुधवारी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. समितीचे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, सकाळी मध्य नाशिक परिसरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली, शिवाजी रोड परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती.

अनधिकृत धार्मिक स्थळे

मांगीर बाबा देवस्थान (दत्त चौक), दत्त मंदिर (तुळजाभवानी चौक), दत्त मंदिर (विजयनगर बस स्टॉप परिसर), दत्त मंदिर (महालक्ष्मी चौक), श्री गणेश मंदिर व महादेवाची पिंड (शिवशक्ती चौक), मरीमाता मंदिर (कामठवाडा), श्री दत्त मंदिर  (माऊली लॉन्स), श्री दत्त मंदिर (शिवपुरी चौक), श्री लक्ष्मी माता मंदिर (महाकाली चौक), म्हसोबा मंदिर (वडाळा पाथर्डी रस्ता)

असा बंदोबस्त राहिला

नवीन नाशिक परिसरात बुधवारी झालेल्या अतिक्रमण मोहिमेसाठी महापालिकेचे ४ डंपर, सहा जेसीबी, सहा ट्रॅक्टर, कॉम्प्रेसर, ड्रिल, बांधकाम अभियंता, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, नगररचना अधिकारी व कर्मचारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, ३५ कर्मचाऱ्यांसह ९ पोलीस अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी (२० महिला पोलीस), सहा मोठय़ा गाडय़ा, पाच लहान आकाराची वाहने, एक व्रज वाहन, आरसीपी एक तुकडी आदींचा सहभाग राहिला.