भाजप नगरसेवकांचा जिल्ह्यातच मुक्काम

नाशिक : जळगाव महापालिकेत भाजपच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक फुटल्याने संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे. भाजपचे जवळपास २८ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे सांगितले जाते. त्यातील काही माघारी फिरले. तथापि, विजयासाठी आवश्यक असणाऱ्या जादूई आकड्यापेक्षा अधिक मते आपल्याकडे असल्याचा दावा सेना करीत आहे. दुसरीकडे भाजपने चार प्रकारे पक्षादेश बजावत आपलाच पुन्हा महापौर होईल, असा दावा केला आहे. जळगावच्या या निवडणुकीशी आता नाशिकचाही संबंध आला असून काही नगरसेवकांना जिल्ह्यात आणले गेले आहे.

जळगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक १८ मार्च रोजी होत आहे. एकूण ७५ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ आहे. जवळपास निम्मे नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपच्या सत्तेला अडीच वर्षात ग्रहण लागल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने फोडाफोडीच्या राजकारणाने आपला खुंटा मजबूत केला होता. तोच कित्ता सेना आता गिरवत आहे. जळगाव म्हणजे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला. घरच्या धावपट्टीवर त्यांना चितपट करण्यासाठी सेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. भाजपच्या फुटीर नगरसेवकांसह सेनेचे नगरसेवक नाशिकमार्गे मार्गस्थ झाले. भाजपने आपल्या नगरसेवकांना सुरक्षितस्थळी नाशिकमार्गे सुरक्षित स्थळी हलविल्याचे बोलले जाते. भाजपमध्ये उभी फूट पडली असून निम्म्याहून अधिक नगरसेवक सेनेसोबत असल्याचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी सांगितले. भाजप, एमआयएमचे सदस्यांच्या पाठबळावर जळगावमध्ये पुढील महापौर शिवसेनेचा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. महापौरपदासाठी शिवसेनेने जयश्री महाजन अणि उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने अद्याप या पदांसाठी नावे जाहीर केलेली नाहीत. ही नावे बुधवारी जाहीर केली जातील असे भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी सांगितले. भाजपकडे आवश्यक  बहुमत आहे. सर्वच्या सर्व ५७ नगरसेवकांवर चार प्रकारे पक्षादेश बजावण्यात आला आहे. पक्षादेशाचे जे उल्लंघन करतील, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहील, असे बालाणी यांनी सूचित केले. महाजन यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.

स्वतंत्र गट स्थापण्यात अडचण

जळगाव महापालिकेत भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या दृष्टीने अद्याप पाऊल टाकले गेलेले नाही. असा गट स्थापन करण्यासाठी दोनतृतीयांश सदस्य पक्षातून बाहेर पडणे आवश्यक असते. भाजपच्या एकूण सदस्यांचा विचार करता ३८ नगरसेवक असल्यास असा गट स्थापन करता येईल. त्याला काही नगरसेवक कमी असल्याने तसा गट स्थापन करण्यात अडचण झाली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपालिका विभागातून जळगाव महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोणीही अर्ज केला नसल्याचे सांगण्यात आले. महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक पार पाडून त्यावर विचार करण्याचे सेनेने निश्चित केले आहे.