शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या प्रक्रियेत महापालिकेने आता हॉटेल व्यावसायिकांकडे लक्ष वळविले आहे. कॉलेज रोडवरील ‘करी लिव्हज्’ हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे इतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या पर्वण्यांनंतर थंडावलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने गेल्या काही दिवसांत चांगलीच गती पकडली आहे. प्रमुख मार्गावरील अतिक्रमणाच्या पाठोपाठ आतील रस्त्यावरील निवासी भागातील अनधिकृत बांधकामे, पालिका व शासकीय जागेवरील बांधकामे हटविण्याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले होते.
आता हॉटेल व्यावसायिक पालिकेच्या रडारवर आले आहेत. कॉलेज रोडच्या पाटील कॉलनीतील चैतन्य सहकारी सोसायटीतील उष:काल बंगल्यात हॉटेल करी लिव्हज् आहे. विक्रम उगले यांच्या ताब्यात असणाऱ्या या जागेवर ५२ बाय १५ फूट आकाराच्या स्वयंपाकगृहाचे पक्क्या स्वरूपात बांधकाम केले गेले होते. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या नावाने कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. तिथे बडय़ा अधिकारी वर्गाची ये-जा असते. त्यामुळे संबंधित हॉटेलवर कारवाई होईल की नाही याबद्दल स्थानिकांना साशंकता होती. परंतु महापालिकेने ती फोल ठरविली. पथकाने पक्क्या स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. या कारवाईची अन्य व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. वाहनतळ वा अन्य ठिकाणची अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे व्यावसायिक ते काढत नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात असल्याचे या विभागाने म्हटले आहे.