गिरीश महाजन यांच्यापुढे तक्रारींचा पाढा

नाशिक : महापालिकेची एकहाती सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या वर्षांत रुळलेली समीकरणे गेल्या सहा महिन्यांत नियमाधारित कामांच्या दंडकाने विस्कटल्याने भाजप नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. या तक्रारींमागे आयुक्तांनी महापालिकेच्या कारभाराला लावलेली कठोर आर्थिक शिस्त हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले. सहा महिन्यांत सर्वच कामांच्या निविदा प्राकलनापेक्षा कमी दराने देऊन कोटय़वधींची बचत केली. मनमानी कारभाराला चाप लागल्याने पालिकेत रूढ झालेली अर्थकारणाची साखळी मोडीत निघाली. या घडामोडी भाजप सदस्यांच्या अस्वस्थतेला खतपाणी घालणाऱ्या ठरल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत आहे.

स्थायी समितीत प्रशासकीय प्रस्ताव रोखून मुंढे यांची कोंडी करणाऱ्या भाजप सदस्यांबरोबर आमदार, महापौर, नगरसेवकांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्तांवर शरसंधान साधले. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुंढे आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात सख्य राहिलेले नाही. त्याची कारणे दोन. मुंढे यांचे सत्ताधाऱ्यांचे अनुनय न करण्याचे धोरण आणि शिस्तबद्ध, नियमानुसार, पारदर्शक कामांचा आग्रह. या बाबी भाजप पदाधिकाऱ्यांना अडचणीच्या ठरल्या.भाजप नगरसेवकांनी विविध तक्रारींद्वारे मुंढे यांना लक्ष्य केले. पण, चुकीच्या पद्धतीने, नियम डावलून कोणतेही काम केले जाणार नसल्याचे मुंढे यांनी ठणकावले.