महिलेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली. संभाजी चौकातील सिटी सेंटर मॉल परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शेट्टी (२५ क्रांतीनगर) असे अटक केलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. परिसरातील महिला रात्री संभाजी चौकातील किराणा दुकानात जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचा संशयीत रिक्षा चालकाने पाठलाग करून तिचा विनयभंग केला.

हमालावर हल्ला

मद्य सेवनासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने बाजार समितीत हमाली काम करणाऱ्या युवकावर हत्याराने हल्ला केल्याची घटना पेठरोड भागात घडली. त्यात संबंधित युवक जखमी झाला असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छींद्र कांबळे (रा. फुलेनगर) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. नवनाथनगर येथील भिमा गवे (२३) या युवकाने या प्रकरणी तक्रार दिली. रात्री बाजार समितीतील काम आटोपून आपण घरी परतत असतांना ही घटना घडली. गवे बच्छाव हॉस्पिटल समोरून पायी जात असताना संशयिताने त्यास गाठून मद्य सेवनासाठी पैसे देण्याची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने गवेवर तिक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून त्याला जखमी केले.

क्रेडीट कार्डद्वारे ७६ हजार लंपास

ओटीपी नंबर मिळवत क्रेडीट कार्डच्या माध्यमातून भामटय़ांनी महिलेला ७६ हजाराचा गंडा घातला. ‘रिवार्ड प्राईज’च्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. नंतर भामटय़ांनी रोकड ऑनलाईन ट्रान्सफर केली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विनी आठल्ये (अश्विनीनगर,सिडको) या महिलेने तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी भामटय़ांनी एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत महिलेस गंडविले आहे. संपर्क साधत भामटय़ांनी महिलेची वैयक्तिक सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर रिवार्ड प्राईज मिळाले का ? असे प्रश्न करीत संशयितांनी त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती घेतली. यावेळी महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेत संशियतांनी क्रेडीट कार्डचा ओटीपी नंबर मिळवून ७६ हजार ६२ हजार रूपयांची रोकड परस्पर पे झॅप वॉलेट ऑनलाईन ट्रान्स्फर करून फसवणूक केली.