नव्या यादीत जुने उपक्रम लुप्त; घरफोडय़ांच्या घटना सुरूच 

शहर पोलिसांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत असताना जुने उपक्रम मात्र त्यात लुप्त पावत आहेत याचा विसर पोलिसांना पडला आहे. ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ या स्तुत्य उपक्रमाला नवीन उपक्रमांचा फटका बसला आहे. परिणामी घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून  गंगापूर रस्त्यावरील आनंदवली आणि आकाशवाणी परिसरात घरफोडय़ांच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरटय़ांनी सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.

शहर पोलिसांतर्फे कधीकाळी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रम राबविला जात होता. घराच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडताना शेजारील कुटुंबीयांना कल्पना देणे,  एखाद्या इमारतीत कोणी अनोळखी व्यक्ती भ्रमंती करताना दिसल्यास पोलिसांना माहिती देणे हा उपक्रमाचा भाग होता. नागरिक दक्षता बाळगून किमान आपल्या घरालगत पहारेकऱ्याची भूमिका निभावू शकतात. तशी खबरदारी घेतल्यास चोरी, घरफोडय़ांच्या घटना नियंत्रणात आणता येतील हा या उपक्रमाचा उद्देश  होता. पोलीस या दृष्टिकोनातून मार्गदर्शनही करीत होते. पोलिसांनी हा उपक्रम उत्तमरीत्या चालविला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता.  मात्र, सध्या नवीन उपक्रमांच्या मांदियाळीत या पर्यायाचा जणू विसर पडला आहे. त्याविषयी पोलीस वर्तुळात साधी चर्चादेखील होत नसल्याची स्थिती आहे

उपक्रमच लुप्त पावल्यामुळे काही महिन्यात शहरात घरफोडीच्या घटनांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. एरवी दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीत अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असे. सुटीनिमित्त अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. ही संधी साधून चोरटे सक्रिय होऊन बंद घरे लक्ष्य करीत असल्याचे दिसत होते. ते उपक्रमांतर्गत बंद झाले होते. परंतु, आता चोरटे कायमस्वरुपी सक्रिय झाल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. दरम्यान, चोरटे प्रामुख्याने बंद घरांमध्ये घरफोडी करत असल्याचे दिसून येते. या स्थितीत नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे.

घरफोडय़ांच्या घटनांत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

आनंदवली येथील रेणूका रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या पूजा पवार या सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ९३ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. दुसरी घटना गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी परिसरात घडली. देवेंद्र शिर्के (रा. ईशावस्यम, पूर्णवादनगर) हे काही दिवसांसाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. कपाटातून सुमारे दोन लाख ७२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या दोन्ही गुन्ह्य़ांप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.