शहर आणि परिसरात करोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्याने बाधितांचा आकडा १५ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असला तरी दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत ११ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्य़ात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७.१९ टक्के आहे. करोनामुळे आतापर्यंत ४९९ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात फिरत्या वाहनाद्वारे होणारी आरोग्य तपासणी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालानुसार सद्यस्थितीत दोन हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहरात करोनाचा आलेख उंचावत आहे. २४ तासात ५७४ रुग्ण आढळले. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण नाशिक शहरातील आहेत. शहरातील करोनाबाधितांचा आकडा साडेनऊ हजारचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून यातील सात हजार ३०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्यस्थितीत नाशिकमध्ये सर्वाधिक १८२८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात करोनामुळे २७६ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या साडेचारशेवर पोहचण्याच्या स्थितीत आहे. शहरात सुरू असलेल्या शून्य मोहिमेचा शनिवार हा ११ दिवस. वैद्यकीय पथके अविरतपणे काम करत आहेत. त्यांना रविवार आणि सोमवारी दोन दिवस विश्रांती दिली जाणार आहे. मंगळवारपासून वैद्यकीय पथके फिरत्या वाहनाद्वारे पुन्हा नव्या दमाने काम करतील, असे महापालिकेने म्हटले आहे.

ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढत आहे. सद्यस्थितीत नाशिक तालुक्यात १०४, चांदवड ५१, सिन्नर १२८, दिंडोरी ५१, निफाड १४५, देवळा १११, नांदगांव ९८, येवला १६, त्र्यंबकेश्वर २९, सुरगाणा १०, कळवण दोन, बागलाण ३६, इगतपुरी ४४, मालेगांव ग्रामीण ३९ याप्रमाणे एकूण ८६४ जणांवर उपचार सुरू आहेत. मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९३ तर जिल्ह्याबाहेरील पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून नाशिक शहरात ती ७७.६४, मालेगावमध्ये ८६.३८ तर नाशिक ग्रामीणमध्ये ७२.२३ अशी आहे.