पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बाद करीत नवीन ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला असला तरी अजूनही नवीन नोटा मिळविण्यासाठी मोठे दिव्य पार पाडावे लागत असल्याने नागरिकांमध्ये आता अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. कित्येक तास रांगेत उभे राहूनही नवीन नोटा मिळत नसल्याची स्थिती एकीकडे असताना दुसरीकडे घरातील सुटे पैसे संपू लागल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सर्वाकडूनच नकारघंटा वाजविण्यात येत आहे. शासनाने पेट्रोल पंप, बस, रेल्वे, औषध दुकाने, रूग्णालय या आवश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यात येतील असे जाहीर केले आहे.

२४ नोव्हेंबपर्यंत त्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली असली तरी संबंधित बहुतांश ठिकाणी सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ामुळे ५०० किंवा हजार रुपयांचा माल घेण्यास सांगितले जात आहे. पेट्रोल पंपांवर जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्या तरी ५०० किंवा हजार रूपयांचे पेट्रोल भरण्यास सांगण्यात येते. १०० किंवा २०० रुपयांचे पेट्रोल सुटे पैसे असतील तरच दिले जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत, त्यांची गैरसोय होत आहे. ग्राहक आणि पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांच्यात वादविवादाचे प्रकारही झडत आहेत. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर पहिले तीन दिवस ग्राहकांनी आपल्याकडील सुटे पैसे फारसे बाहेर काढले नाहीत. परंतु, त्यानंतर सुटे पैसे बाहेर काढण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक सुटय़ा पैशांचा वापर भाजीपाला खरेदी किंवा इतर किरकोळ खरेदीसाठी करू लागले. आता तर त्यांच्याजवळील सुटे पैसेही संपत आल्याने वेगळीच समस्या उभी राहिली आहे.

औषध दुकानदार किंवा किराणा दुकानदार अधिक माल घेतल्यावरच उधारीवर राहण्याची तयारी दर्शवित आहेत. १००, २०० रुपयांपर्यंतचा माल घेतल्यावर तेही उधारीवर राहण्यास नकार देत आहेत. सर्वत्र सारखीच स्थिती असल्याने मित्र किंवा नातेवाईकांकडेही पैसे मागण्याची सोय राहिलेली नाही. कोणी सुटे पैसे देण्यास तयार नसल्याने नागरिक अधिक अस्वस्थ झाले आहेत. बँकांमधून नवीन ५०० किंवा दोन हजार रुपयांच्या नोटा देण्याऐवजी १००, २०० रुपये देण्यास प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ५०० किंवा दोन हजार रूपयांची सध्याच्या स्थितीत कोणालाही गरज नाही. कारण या नोटांच्या बदल्यात सुटे पैसे देण्यास कोणीही तयार नसल्याने त्यांचा उपयोग तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाधिक प्रमाणात सुटे पैसे बाहेर कसे येतील यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. या परिस्थितीत लवकर सुधारणा न झाल्यास नागरिकांमधील अस्वस्थतेचा उद्रेक होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.