नाशिक पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी सायबर गुन्ह्याबाबत तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे देखील उद्घाटन करण्यात आले. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकमध्ये सायबर गुन्ह्याबाबत तक्रार करण्यासाठी विशेष सायबर पोलीस ठाणे सुरु झाल्यामुळे नाशिककरांना यासबंधीची तक्रार देणे सुलभ होणार आहे.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल, उपआयुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल पवार उपस्थित होते.
गतवर्षी १५ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ‘सायबर कक्ष’ सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून ४० गुन्ह्यांची नोंद झाली असून ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आतापर्यंत ३३ आरोपींना सायबर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ५ लाख १० हजार रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.  सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करणे नागरिकांना आता सोपे होणार आहे.