एकाच रांगेत दोन हजार सायकलपटू कापणार १० किलोमीटर अंतर

देशाची सायकल राजधानी म्हणून नाशिकची ओळख निर्माण करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनने दोन हजारहून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने एका रांगेत सायकलने सर्वाधिक अंतर कापून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प सोडला आहे. ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या उपक्रमात दोन हजार सायकलपटू एका रांगेत विशिष्ट अंतर राखत सायकलने १० किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. यापूर्वी १२०० सायकलपटूंनी बांग्लादेशच्या ढाका येथे ‘लाँगेस्ट सिंगल लाइन ऑफ बायसिकल्स मूव्हिंग’द्वारे दोन मैलांचे अंतर कापल्याचा विक्रम आहे. तो मोडीत काढून नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या उपक्रमाची माहिती फाऊंडेशनचे नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण खाबीया यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वविक्रमाची नोंद करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे नोंदणी करण्यात आली आहे. एका रांगेत विशिष्ट अंतर राखून दोन हजार सायकलपटू दहा किलोमीटरचे अंतर पार करतील. त्यात ५० टक्के म्हणजे एक हजार महिला सायकलपटू असतील. या उपक्रमात नाशिकसह बाहेरील जिल्ह्यातील सायकलपटू सहभागी होऊ शकतात. कोणतीही सायकल घेऊन सहभागी होता येईल. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वाना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलपटूला हेल्मेट व टी शर्ट देण्यात येणार असल्याचे खाबीया यांनी नमूद केले. या अनुषंगाने शहरातील शाळा व महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. महापालिका व आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही त्यात समाविष्ट केले जाईल. फाऊंडेशनचे सध्या १७५० सदस्य आहेत. ही संख्या वाढविण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. विश्वविक्रमासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर अथवा मखमलाबाद-मातोरी-गिरणारे या मार्गाचा विचार सुरू आहे.

फाऊंडेशनचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांनी सायकलिंग चळवळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. ती आणखी विस्तारण्यासाठी फाऊंडेशन नवनवीन उपक्रम राबविणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी बाल दिनानिमित्त चिल्ड्रन राईड, सायकलवरून पत्र तसेच महत्त्वाचे कागदपत्र पोच करणाऱ्या पोस्टमन काकांसाठीची पोस्टमन राइड, दिवाळी मीलनअंतर्गत नाशिक सायकलिस्ट नवीन कपडे व फराळ आदिवासी पाडय़ांवर वितरण, जागतिक प्रेम दिनी टॅण्डम सायकल राइड, इंटरनॅशनल राइड, समुद्रकिनाऱ्यावर कोस्टल राइड, पंढरपूर वारीच्या धर्तीवर अष्टविनायक सायकलयात्रा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. औद्योगिक वसाहत व निवासी भागात घरगुती काम करणाऱ्या अनेक महिला आजही सायकलचा वापर करतात. महिला दिनाच्या दिवशी या महिलांचा फाऊंडेशन सन्मान करणार आहे. या वेळी श्रीकांत जोशी, विशाल उगले आदी उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मनोदय

आदिवासी भागातील विद्यार्थी शाळेत ये-जा करण्यासाठी दररोज दोन ते पाच किलोमीटपर्यंतची पायपीट करतात. या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात दोन हजार सायकल वितरण करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. त्यासाठी शहरात ज्यांच्याकडे जुन्या सायकल पडून आहेत, त्या संकलित करण्यात येतील. या सायकल दुरुस्त करून त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत.