22 January 2021

News Flash

पावसाचा जोर ओसरला

निम्मी धरणे भरण्याच्या मार्गावर

निम्मी धरणे भरण्याच्या मार्गावर

नाशिक : आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असून  २४ तासांत जिल्ह्य़ात १४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोमवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे जिल्ह्य़ातील निम्मी धरणे तुडुंब भरण्याच्या स्थितीत आहेत. काही पूर्ण क्षमतेने भरली असून काहींमधून वेळापत्रकानुसार विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांतील जलसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या हंगामात जिल्ह्य़ात १२ हजार ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण बरेच कमी आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. सोमवारी पावसाचा जोर कमी झाला. इगतपुरी ५४, त्र्यंबकेश्वर २४, पेठ २६, सुरगाणा २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड, बागलाण, कळवण तालुक्यांत दोन ते सहा मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस झाला. सिन्नर, देवळा, नांदगाव, येवला, मालेगाव या पाच तालुक्यांत पावसाने दडी मारली. हंगामात प्रारंभीचे दोन महिने अनेक भागांत पाऊस गायब झाला होता.

ऑगस्टच्या मध्यावर झालेल्या पावसाने धरणांच्या जलसाठय़ात वाढ होण्यास सुरुवात झाली.  सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील २४ पैकी जवळपास निम्मी धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. ऑगस्ट अखेपर्यंत धरणात किती जलसाठा असावा, या वेळापत्रकानुसार विसर्ग केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ९४ टक्के जलसाठा झाला आहे. त्यातून एक हजार क्युसेसने विसर्ग सुरू आहे. ९३ टक्के भरलेल्या दारणा धरणातून १० हजारहून अधिक क्सुसेसने विसर्ग कायम आहे. भावलीमधून (१०० टक्के) ३८२, वालदेवी (५२) २४१, कडवा (१००) १२७२, नांदूरमध्यमेश्वर (६६) १४२३४, भोजापूर (१००) ७६, चणकापूर (८२) १४८९, हरणबारी (१००) ८४६, केळझर (१००) १९८, पुनद (८८) ९४० क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय नागासाक्या (८६ टक्के), माणिकपुंज (१००), पालखेड (७६), मुकणे (७२), गिरणा (६६) असा जलसाठा झालेला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा

जिल्ह्य़ातील २४ धरणांमध्ये सध्या ४७ हजार ६४४ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. हे प्रमाण ७२ टक्के इतके आहे. गेल्या वर्षी याच सुमारास धरणांमध्ये ५९ हजार ३९५ दशलक्ष घनफूट अर्थात ९० टक्के जलसाठा होता. यंदा हे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्य़ातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:04 am

Web Title: nashik district has received 149 mm of rainfall in 24 hours zws 70
Next Stories
1 Coronavirus : रुग्ण बरे होण्याचा नाशिकचा दर चांगला
2 जिल्ह्य़ातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच
3 कांदा दरात २५० रुपयांनी घसरण
Just Now!
X