‘कायाकल्प’चा दुसऱ्यांदा बहुमान मिळविण्यासाठी जोरदार तयारी

आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘कायाकल्प पुरस्कारात’ नाशिक जिल्हा रुग्णालयाने मोहर उमटविल्यानंतर दुसऱ्या वर्षीही हा बहुमान पटकावण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मंगळवारी कायाकल्प परीक्षक समितीचा दौरा असल्याने रुग्णालय परिसराचे रूपडे अवघ्या काही क्षणात पालटले. रंगरंगोटीसह, स्वच्छता अशी आन्हिक उरकल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दिवसभर रुग्णसेवेवर भर दिल्याने सर्वांना सुखद धक्का बसला.

सरकारी रुग्णालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा जास्तीतजास्त रुग्णांपर्यंत पोहचाव्या हे करताना रुग्णालय परिसर स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा याकडे लक्ष देण्यात यावे यासाठी आरोग्य विभागाने ‘कायाकल्प’ पुरस्कार सुरू केला आहे. मागील वर्षी राज्यात नाशिक जिल्हा रुग्णालय अव्लल ठरले. मात्र नंतरच्या काळात रुग्णालय मळ पदावर असतांना कायाकल्पच्या दुसरा वर्षांचे कामकाज सुरू झाले आहे.

मंगळवारी या संदर्भात जिल्हा रुग्णालयात कायाकल्प पुरस्कार निवड समितीचे काही सदस्य येणार असल्याने सोमवारी रात्री उशिरापासूनच रुग्णालयाच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी ठिकठिकाणी पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती धुऊन स्वच्छ करण्यात आल्या. कधी वेगवेगळ्या कक्षात झाडू, लादी पुसणे कामे झालेले नसताना मंगळवारी सकाळी व दुपारी अशी दोन्ही वेळेस लादी पुसण्यात आली.

दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था करत फिनाईल किंवा तत्सम द्रव्य टाकत तो भाग स्वच्छ करण्यात आला. वाहनतळ परिसरात जमा झालेला पालापाचोळा अन्य कचरा संकलित करण्यात आला. कक्षात जागोजागी स्वच्छता अभियानाचा संदेश देणाऱ्या कचरा पेटय़ा ठेवण्यात आल्या. स्वच्छतेसाठी काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रंगरंगोटी तर काही ठिकाणी दोन वेळा झाडु पोचा करत स्वच्छतेचे सोपस्कार पार पडण्यात आले. या निमित्ताने वेगवेगळ्या कक्षात रुग्णांच्या खाटांवर असलेल्या फाटक्या चादरी काढत त्या ठिकाणी नव्या चादरी आल्या.

मात्र त्या काही वेळाने काढून घेण्यात येणार असल्याने घाण करू नका अशी सूचना करण्यास स्वच्छता कर्मचारी विसरले नाही. रुग्णालयाचा प्रथमदर्शनी भाग आल्हाददायी वाटावा यासाठी शोभेच्या कुंडय़ा तेथे दिमाखाने विराजमान झाल्या. रुग्णांच्या नातेवाईकांना स्वच्छतेसंदर्भात वारंवार सूचना करत असताना स्वच्छता अजून किती वेळ करायची अशी विचारणा सुरू राहिली. दरम्यान, एकीकडे स्वच्छता मोहिमेचे सोपस्कार पार पडत असताना रुग्णसेवेकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आल्याने रुग्णांसाठी हा सुखद धक्का ठरला. दुपारी उशिराने समितीने आपला दौरा आटोपला.