30 September 2020

News Flash

वृक्ष लागवडीसाठी जिल्हा सज्ज ३० लाख रोपांची लागवड होणार

वृक्ष लागवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत.

वृक्षारोपण मोहिमेत सर्वानी सहभागी व्हावे यासाठी त्र्यंबकेश्वर येथे काढण्यात आलेली जनजागृती दिंडी.

 

‘एकच लक्ष्य, दोन कोटी वृक्ष’ या अभिनव प्रयोगासाठी जिल्हा प्रशासनासह सामाजिक संस्था सज्ज झाल्या आहेत. जिल्हा परिसरात बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले असून वृक्षारोपणासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नागरिक आणि पर्यावरणप्रेमींच्या उत्साहाला आलेले उधाण पाहून वृक्ष लागवडीबरोबर संवर्धनासाठी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वृक्ष लागवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त वन विभागासह विविध शासकीय विभागांतर्फे वृक्षारोपणाच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हय़ात एकूण ३० लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. नाशिक पश्चिम विभागात सकाळी ९ वाजता हरसूल रोडवरील सपाते गावाजवळ सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यास पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, महापौर अशोक मुर्तडक आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचा आढावा घेऊन तयारी पूर्णत्वास नेली आहे. वन विभागाच्या सहकार्याने पर्यावरणप्रेमींनी काही मोकळ्या जागा निश्चित करत त्या ठिकाणी वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. त्यासाठी बागलाण आणि देवळा तालुक्यासाठी लोहणेर रोपवाटिका, चांदवड आणि येवला तालुक्यासाठी वाघदर्डी, पेठ आणि दिंडोरी तालुक्यासाठी ओझरखेड, इगतपुरी तालुक्यासाठी मुकणे, कळवण तालुक्यासाठी चणकापूर, मालेगावसाठी टिंगरी, नांदगावकरिता नाग्यासाक्या, नाशिकसाठी गंगाकाठ, निफाडमध्ये शहरातील नर्सरी, सिन्नरसाठी गंगापूर, सुरगाणा तालुक्यात खडकवन, त्र्यंबकेश्वर तालुक्यास नाशिक तालुक्यातील गंगापूर नर्सरीमधून रोप वितरणाचे काम पूर्वसंध्येला युद्धपातळीवर करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत पश्चिम वन विभाग ९ लाख ४५ हजार, पूर्व विभाग ९ लाख ४२ हजार, मालेगाव वनविभाग ५ लाख ७६ हजार, सामाजिक वनीकरण विभाग २५ हजार, एफडीसीएम तीन लाख, वन्यजीव २०० आणि इतर सरकारी विभागांमार्फत ५ लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. वन विभाग चिंच, आवळा, पिंपळ, वड या रोपांची लागवड करणार आहे. शहर परिसरात पहिल्यांदाच सामूहिक वृक्षारोपणाचा प्रयत्न होत असल्याने पर्यावरणप्रेमी, नागरिक, विद्यार्थी त्यात सहभागी होत आहेत. लोकसहभाग व वृक्षारोपणासाठी पुढे आलेल्यांची संख्या पाहून वन विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यात रोप लागवडीसाठी विविध गावे, पाडे येथे जागा निश्चित करण्यात आल्या. प्रशासनाला वृक्षारोपणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे.

लोकसहभागातून पर्यावरणाचा विकास असा उद्देश ठेवत शहरातील काही समविचारी तरुणांनी एकत्र येत काही महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. या उपक्रमास ‘ग्रीन रिव्होल्यूशन’ नाव देत त्यांनी वृक्षारोपणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. वन विभागाच्या मदतीने या संस्थेने अंबड एमआयडीसीजवळील चुंचाळे परिसरातील टेकडी दत्तक घेतली. तिचे ‘आनंदकानन’ नामकरण करत दर शनिवारी आणि रविवारी सकाळी दोन तास एकत्र येऊन श्रमदान करून वृक्षारोपणासाठी आतापर्यंत सहा हजार खड्डे खोदण्यात आले. त्यात डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले असल्याची माहिती संस्थेचे डॉ. संदीप आहिरे यांनी सांगितले. टेकडीवर पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ५० बंधारे तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचा निधी संकलित न करता स्वयंस्फूर्तीने हे काम सुरू झाले आहे.

या चळवळीत २०० नागरिक सहभागी झाले. चिंच, आवळा, शिसव, बेहडा, वड, पिंपळ, आवळा आदी रोपांची या ठिकाणी लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्र्यंबके श्वर परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली. स्वाध्याय परिवाराच्या वतीने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी वृक्षारोपणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देताना नागरिकांनी घरून पाच लिटरची कॅन भरून आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे. टँकरने पाण्यासह आवश्यक खतेही ठेवण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:04 am

Web Title: nashik district is ready for tree plantation
Next Stories
1 महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल, संशयित मोकाट
2 द्वारका चौकातील सहा मार्ग वाहतुकीसाठी आजपासून बंद
3 लाच स्वीकारणाऱ्या भूसंपादन मंडळ अधिकाऱ्यास सक्तमजुरी
Just Now!
X