सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत नाशिक जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आठवडाभरापासून चाललेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुन्हा त्याचे सावट दाटल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षितस्थळी ठेवावा, पावसामुळे तो खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीपासून परतीच्या पावसाने जिल्ह्य़ात थैमान घातले आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा मुसळधार पावसाचे संकट उभे ठाकले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपरोक्त काळात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

शेतमाल भिजून खराब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वादळी वाऱ्याने शेड, पत्रे, कमकुवत घरे, झाडे, गुरांचे गोठे, पशुपालन शेड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळांसह घरांचे पत्रे, कांदा चाळीवरील पत्रे वाऱ्यामुळे उडू शकतात. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. अतिवृष्टीमुळे विसर्ग करावा लागल्यास नदीकाठावरील नागरिकांनी सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. वीज खांबापासून दूर राहावे. जनावरांना नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. वाहत्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करू नये. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गोदावरीला पूर आल्यास पंचवटी, रामकुंड क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, असे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे.