गोवर, रुबेला लसीकरण मोहीम

नाशिक : बालकांची गोवर आणि रुबेलाविरोधी रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस पालकांचा प्रतिसाद लाभत आहे. नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्रात या लसीकरणात अव्वल असून आतापर्यंत ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

बालकाला गोवर आणि रुबेलाची लागण होऊ नये, भविष्यात या आजारामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी, नवजात शिशूला येणारे अपंगत्व टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना गोवर, रुबेला लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. हे लसीकरण आरोग्य विभागाने मोफत ठेवून नऊ महिने ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना त्यात सहभागी करून घेण्यात आले.

सुरुवातीपासून सूक्ष्म नियोजनावर भर देत लसीकरण यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले. यासाठी विभागाचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य साहाय्यक, निरीक्षक आणि अन्य कर्मचारी अशी संपूर्ण फळी कामास लागली. मोहीम सुरू होण्याआधी पोषक वातावरणनिर्मितीसाठी विद्यार्थ्यांच्या घरी माहितीपत्रके देण्यात आली. परिसरातून फेऱ्या काढत त्याविषयी जनजागृती करण्यात आली.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मोहिमेस सुरुवात झाली. राज्यात गोवर, रुबेला लसीकरणात वेगवेगळ्या अडचणी येत असतांना जिल्हय़ात मात्र शाळांनी यासाठी सहकार्य केले. लसीकरणात कुठलीही अडचण येऊ नये, बालकाला काही त्रास झालाच तर आरोग्य पथकासोबत जीवनदायी औषधे देण्यात आली होती.

पहिल्या टप्प्यात शाळा झाल्यानंतर अंगणवाडीतील बालकांना आणि त्यानंतर घरोघरी जात वंचित बालकांना लसीकरण करण्यात आले. जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात आरोग्य अधिकाऱ्याच्या अंतर्गत १० लाख ७४,३९८, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अंतर्गत एक लाख २२, ३३१, नाशिक महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत तीन लाख ६४,८३५ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले. या लसीकरण मोहिमेत मालेगाव महापालिका क्षेत्र मागे राहिले. एक लाख ९३,८२२ पैकी केवळ ९३,५६८ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मालेगावमध्ये लसीकरणास होणारा विरोध पाहता आरोग्य विभागाकडून प्रबोधनावर भर देण्यात येत असून ही टक्केवारी पूर्ण करण्याकडे कल ठेवण्यात आला आहे.

निफाडसह अन्य ठिकाणी ऊसतोडीसह अन्य शेतीच्या कामासाठी बाहेरगावहून येणाऱ्या कुटुंबासोबत त्यांची लहान मुलेही येत आहेत. या बालकांना सध्या लसीकरण करण्यात येत आहे. जी बालके शाळेत गैरहजर राहिली, अशा वंचित बालकांनाही सध्या लसीकरण करण्यात येत असून लवकरच ९५ टक्क्यांचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.

मालेगाव पिछाडीवर

गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेत नाशिक जिल्हा परिसरात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र या ठिकाणी आतापर्यंत ९४ टक्के लसीकरण झाले असून मालेगाव या मोहिमेत मागे आहे. केवळ ४८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आरोग्य संचालक डॉ. रत्ना रावखंडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मालेगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील धर्मगुरू, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. असे असले तरी अद्याप परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. या ठिकाणी लसीकरणासाठी कालावधी वाढवून घेण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले.