09 December 2019

News Flash

विभागीय अंतिम फेरीत नाशिकचे ‘पंचक’

नाशिकरोडच्या आरंभ महाविद्यालयाच्या ‘कोलाज्’मधून संगीत नाटय़ हा अभिनव प्रयोग सादर केला.

’ नाशिक विभागातील प्राथमिक फेरी पूर्ण ’ महाअंतिम फेरीतील प्रवेशासाठी पाच महाविद्यालयांमध्ये चुरस
नाशिक शहरासह आसपासच्या परिसरांतील १६ महाविद्यालयांच्या १६ नव्या एकांकिका, महाविद्यालयीन कलाकारांनी जीव तोडून केलेले सादरीकरण आणि आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधील सनातन चुरस या वातावरणात नाशिक विभागातील प्राथमिक फेरी सोमवारी संपली. या फेरीत सादर झालेल्या १६ एकांकिकांपैकी पाच एकांकिकांची निवड नाशिकच्या विभागीय अंतिम फेरीत झाली आहे. या पाच एकांकिकांमधून एक एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडली जाणार आहे. व्हॉट्स अॅप, जाने भी दो यारो, द परफेक्ट ब्लेंड, जेनेक्स, कोलाज् या पाच एकांकिकांची ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागीय अंतीम फेरीसाठी निवड झाली. येथील महाकवी कालिदास कला मंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहात विभागीय प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आठ एकांकिका सादर झाल्यानंतर सोमवारी तितक्याच संघांनी वैविध्यपूर्ण विषय मांडले.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन ‘टॅलेण्ट पार्टनर’ तर स्टडी सर्कल ‘नॉलेज पार्टनर’ आहेत. स्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले. रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम आणि संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजन पार्टनर झी मराठी नक्षत्र आहे. महिलांचे विविध पातळीवर नात्यांच्या गुंत्यात होणारे लैंगिक शोषण, महिलांवरील वाढते अत्याचार, तरूणाईचे स्पंदन बनलेल्या समाज माध्यमांचे परिणाम, अंधश्रद्धांचा पगडा, शासकीय योजनांची सद्यस्थिती यासह काही सामाजिक प्रश्नांकडे दुसऱ्या दिवशी लक्ष वेधण्यात आले. विषयातील नाविन्यता, सादरीकरणाची पद्धत यामुळे स्पर्धेने वेगळी उंची गाठल्याची भावना परीक्षकांनी व्यक्त केली. केटीएचएम महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्स अॅप’मधून समाज माध्यमांची पकड व दुष्परिणाम याकडे लक्ष वेधण्यात आले. नाशिकरोडच्या आरंभ महाविद्यालयाच्या ‘कोलाज्’मधून संगीत नाटय़ हा अभिनव प्रयोग सादर केला. हंप्राठा महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’मधून आजची तरूणाई आणि जुनी पिढी यांच्यातील वैचारिक दरी याकडे लक्ष वेधण्यात आले. क. का. वाघ महाविद्यालय नाटय़ विभागाच्या ‘जाने भी दो यारो’ने भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईतील अस्वस्थता अधोरेखीत केली. न. बा. ठाकूर विधि महाविद्यालयाच्या ‘द परफेक्ट ब्लेंड’मधून नात्यांची भावनिक गुंतवणूक, मानवी भावविश्व दाखविण्यात आले.
परीक्षक म्हणून अंशू सिंग, धनंजय खराडे यांनी काम पाहिले तर आयरिस प्रॉडक्शन या टॅलेण्ट पार्टनरचे विद्या करंजीकर, दीपक करंजीकर उपस्थित होते.

* नाशिक विभागीय अंतीम फेरीसाठी पात्र एकांकिका
* के.टी.एच.एम. महाविद्यालय – व्हॉट्स अॅप
* क. का. वाघ महाविद्यालय नाटय़ विभाग – जाने भी दो यारो
* न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय – द परफेक्ट ब्लेंड
* हं. प्रा. ठा. कला महाविद्यालय – जेनेक्स
* बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महाविद्यालय – कोलाज

First Published on October 6, 2015 2:17 am

Web Title: nashik division loksatta lokankika primary round complete
टॅग Loksatta Lokankika
Just Now!
X