स्पर्धेत विषयांचे नावीन्य, दर्जेदार अभियन आणि वैशिष्टय़पूर्ण सादरीकरण

विषयांचे नावीन्य, तजेलदार अभिनय आणि वैशिष्टय़पूर्ण सादरीकरण घडविणाऱ्या चार एकांकिकांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय केंद्रात अंतिम फेरी गाठली. १६ डिसेंबर रोजी   विभागीय अंतिम फेरी रंगणार असून या फेरीतील विजेती एकांकिका मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करेल.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाटय़गुणांचा ‘आरसा’ असणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीचा मंगळवारी समारोप झाला.  दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत सामाजिक विषयांसह इतिहासाच्या पानात हरवलेले काही क्रांतिकारी, महात्मा गांधींचे अहिंसा तत्त्वज्ञान, नवमाध्यमांचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम आदी विषय मांडण्यात आले.  मंगळवारी हं.प्रा.ठा. कला महाविद्यालयाची ‘संगीत या ठिकाणी..त्या ठिकाणी’, एस.व्ही.के.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची ‘नि:शस्त्र योद्धा’, धुळे येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘रात्र वैऱ्याची’, नाशिकच्या स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्ट्सची ‘राम मोहम्मदसिंग आझाद’ आणि पंचवटीतील एल.व्ही.एच. वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची ‘मी टू’ या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धेत परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखक राजीव जोशी, रंगकर्मी हेमा जोशी यांनी काम पाहिले.

आयरिस प्रॉडक्शनचे विविध कोरगांवकर, विशाल कदम हेही उपस्थित होते. १६ डिसेंबर रोजी होणारी विभागीय अंतिम फेरी प्रेक्षकांसाठी खुली असून नाटय़प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकसत्ता’च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या उपक्रमासाठी प्रक्षेपण भागीदार देखील आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.

स्पर्धेतील सादरीकरणात मांडण्यात आलेले वेगवेगळे विषय, अभिनय एकंदरच संपूर्ण स्पर्धा समाधानकारक ठरली. – हेमा जोशी (परीक्षक)

विद्यार्थी संधीचे सोने करत असून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाली तर पुढील काही वर्षांत रंगभूमीला नवे कलाकार मिळतील. – राजीव जोशी  (परीक्षक)

‘ आजच्या पिढीचा आजूबाजूच्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे, ते त्यांचे सामाजिक भान टिकवून आहेत. समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे पडसाद या स्पर्धेत पाहायला मिळतात ही खूप सुखद गोष्ट आहे. – विशाल कदम (प्रतिनिधी, आयरिस प्रॉडक्शन)

ऊर्जा, जोश, जल्लोष आणि चोख सादरीकरण याचे समीकरण म्हणजे ‘लोकसत्ता लोकांकिका’. महाविद्यालयांनी या स्पर्धेसाठी केलेली तयारी बघून अचंबित व्हायला होते.  – विविध कोरगावकर (प्रतिनिधी, आयरिस प्रॉडक्शन)

नाशिक विभागीय अंतिम फेरीत दाखल एकांकिका

  • ‘खोल दो’ (के. टी. एच. एम. महाविद्यालय)
  • मिसा’ (एन.बी.टी. विधि महाविद्यालय)
  • संगीत या ठिकाणी..त्या ठिकाणी’ (हं. प्रा. ठा. कला महाविद्यालय)
  • राम मोहंमदसिंग आझाद’ (सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्ट्स)

कोल्हापुरात  प्राथमिक फेरीला प्रारंभ

कोल्हापूर : ‘लोकसत्ता लोकांकिका’ उपक्रमांतर्गत कोल्हापूर केंद्रातील स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृहात महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. एम. रुईकर यांच्या हस्ते  झाले.    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राची अतोनात हानी झाली. याची झळ शहरी-ग्रामीण भागाला बसली. या महापुराच्या वेदनांचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या दोन एकांकिका पहिल्या दिवशी सादर झाल्या. आज,या विभागातून विभागीय अंतिम फेरीसाठी एकांकिका ठरणार आहेत.