‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ची नाशिक विभागीय फेरी उत्साहात
एक उत्तम वक्ता होण्यासाठी विषय आपल्या स्वतला भिडला पाहिजे, आपली मते स्वत तयार करत ती उत्स्फूर्तपणे मांडता येणे गरजेचे आहे. बोलताना श्रोत्याची बौद्धिक तसेच भावनिक पातळी लक्षात घेत भाषेचे सौंदर्य खुलवता आले पाहिजे, अन्यथा ती केवळ आरास ठरते. बोलीभाषा प्रमाण मानली तरी शब्दोच्चार, व्याकरणाचा अभ्यास आणि चौफेर वाचन गरजेचे ठरते, असा कानमंत्र गीतकार संदीप खरे यांनी स्पर्धकांना दिला. निमित्त होते, ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय अंतिम फेरीचे.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक तसेच, ‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑईल’, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी) यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून ‘युनिक अकॅडमी’ आणि ‘स्टडी सर्कल स्पर्धेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्यांमध्ये मुक्त विद्यापीठाचा विवेक चित्ते, भोसला महाविद्यालयाची मुग्धा जोशी, लासलगाव महाविद्यालयाची आदिती भारती यांचा समावेश असून उत्तेजनार्थ पारितोषिक बी. वाय. के महाविद्यालयाची मधुरा घोलप, केटीएचएम महाविद्यालयाची श्वेता भांबरे यांना जाहीर झाले. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्राने गौरविण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात नाशिक विभागाची अंतिम फेरी मंगळवारी सायंकाळी गीतकार खरे, वनाधिपती विनायकदादा पाटील, श्रीधर देशपांडे, डॉ. गिरधर पाटील आदींच्या उपस्थितीत रंगली. प्राथमिक फेरीत विविध नामांकित महाविद्यालयातील ६२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील ११ स्पर्धकांनी नाशिक विभागीय अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीसाठी साहित्य संमेलनाने साधते काय?, भारत एकसंध राज्य आहे?, कोलावरी ते शांताबाई, शेती की उद्योग? आणि पुरस्कार वापसी या विषयांवर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. पुरस्कारवापसी हे सध्या साहित्यिक, कलावंताकडून निषेध नोंदविण्याचे माध्यम म्हणून वापरले जाते. अहिंसेच्या मार्गावरून जाणारी ही आधुनिक सामाजिक चळवळ आहे. मात्र यातून विकासाच्या नावाखाली फॅसिस्ट प्रवृत्ती आपली पाळेमुळे रोवत नाही ना, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत स्पर्धकांनी मांडले. साहित्य संमेलनाने साधते काय, यावर साहित्य केंद्रस्थानी ठेवत संमेलन भरवले जात होते. आता संमेलनाच्या परिघावर साहित्य येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सकस साहित्यावर चर्चा करताना हा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचावा यासाठी लघुपट स्वरूपात तो पुढे येण्याची गरज काहींनी अधोरेखित केली. संमेलनात गर्दी जमविण्यापेक्षा दर्दी जमायला हवे असे मत काहींनी मांडले. शेती आणि उद्योग या विषयावर मत मांडताना बदलता आर्थिक विकास दर पाहता शेतीसाठी जमीन नाही आणि उद्योगासाठी भांडवल नाही अशा परिस्थितीत आपण अडकल्याची जाणीव करून देताना यातून योग्य पर्याय निवडण्याकडे स्पर्धकाने लक्ष वेधले. भारत एकसंध राज्याविषयी राज्य घटनेचा इतिहास, लोकशाहीची वैशिष्टय़े, असहिष्णुतेचे वातावरण या मुद्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
स्पर्धकांशी संवाद साधतांना खरे यांनी स्पर्धकांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. श्रोता तुमच्यासाठी सभागृहात आला आहे त्याचे भान ठेवत त्याला अभिवादन करत विषयांची मांडणी अपेक्षित असते.
ही मांडणी करताना मुळात तो विषय स्पर्धकाला स्वतला समजला पाहिजे. यामुळे मुद्दा पुढे मागे झाला तरी फारसा फरक पडत नाही. स्पर्धकांकडे संहितेमध्ये शब्दभांडार भरलेले असते. हे शब्दसौंदर्य विषयाच्या माध्यमातून पोहचविण्याची कला म्हणजे वक्तृत्वअसल्याचे खरे यांनी सांगितले. परीक्षक म्हणून आकाशवाणी निवेदिका अपर्णा क्षेमकल्याणी, वैशाली शेंडे यांनी काम पाहिले. देवदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता’ने आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा सुखद धक्का ठरली आहे. आज नामशेष होणारी वक्तृत्व कला स्पर्धेनिमित्त पुन्हा विकसित होत आहे याचा आनंद. मात्र वक्तृत्व म्हणजे काय हे आजही लोकांना समजत नाही. शब्दसंपदा, उच्चारावरील आघात, कुठे थांबावे याचे भान ज्याच्याकडे आहे, तो उत्तम वक्ता. लोकसत्ता नेहमीच अडचण असली की धावून आले आहे. कधी पाठीवर शाबासकीची थाप तर कधी खडे बोलही ऐकण्याची वेळ आली. मात्र स्पर्धेच्या युगात आपला विषय घेऊन लोकसत्ता पुढे जाते हे कौतुकास्पद.
-वनाधिपती विनायकदादा पाटील

नाशिक विभागीय अंतिम फेरीत स्पर्धकांना स्पर्धेची उंची गाठता नाही आली. परीक्षक म्हणून आम्ही संहिता शोधत राहिलो. उत्तम वक्ता होण्यासाठी आधी स्वतशी संवाद साधता आला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला जे वाटते ते तुम्ही समोरच्यापर्यंत पोहचवू शकता. वक्तृत्व ही कला असली तरी तिला साधना आवश्यक आहे. इंग्रजीचा वापर टाळा. झरझर बोलण्यापेक्षा नेमके कुठे थांबावे याचा विचार करणे गरजेचे आहे.
-वैशाली शेंडे (परीक्षक)

आजची तरुण पिढी वास्तवतेपासून दूर गेली आहे. युवावर्ग अभ्यास, वाचन करत नाही असा ज्येष्ठांचा समज या स्पर्धेने फोल ठरवला. महाविद्यालयीन विद्यार्थी एखाद्या विषयाची अभ्यासपूर्ण रीतीने मांडणी करताना पाहून थक्क झालो. हा उपक्रम ‘लोकसत्ता’ने यापुढेही सतत सुरू ठेवावा.
-श्रीधर देशपांडे (ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते)