|| अनिकेत साठे

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ; बंडखोरीमुळे रंगत

कोटय़धीश शिक्षण संस्थाचालकांना संधी देऊन भाजप, शिवसेनेने नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वेगळे वळण दिले आहे. आर्थिक ताकदीच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांनी या निवडणुकीला लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांच्या माजी स्वीय साहाय्यकाला टीडीएफचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले असले तरी शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएफचा खरा उमेदवार हे कोणाला सांगता येणार नाही. कारण, या आघाडीचे आपणच खरे उमेदवार असल्याचा दावा करणारे चार ते पाच जण आहेत. सेना, भाजप उमेदवारांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीडीएफशी नाते जोडावे लागत आहे. माजी खासदाराची बंडखोरी भाजपला डोकेदुखी ठरली आहे. चुरशीच्या निवडणुकीत मूळ शिक्षकाचे अस्तित्व राहील, की पुन्हा संस्थाचालक वरचढ ठरतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागील काही वर्षांत नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ म्हणजे टीडीएफ हे समीकरण रूढ झाले होते. अडीच दशकांहून अधिक काळ हा मतदारसंघ टीडीएफच्या ताब्यात होता. आज प्रत्येक गटाचा एक उमेदवार मैदानात आहे. याचा लाभ उठविण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. गेल्या वेळी अपूर्व हिरे यांनी शिक्षण संस्थाचालक विजयी होऊ शकतात, हे दाखविले होते. ही बाब सेना आणि भाजपने हेरली. या वेळी एकूण १६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यामध्ये तीन संस्थाचालक, तर ११ शिक्षक आहेत. भाजपला या निवडणुकीतही उमेदवार आयात करावा लागला. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय नवल पाटील यांचा मुलगा अनिकेतला उमेदवारी देत भाजपने संस्थाचालकांना बळ दिले. स्पर्धेत शिवसेनाही मागे नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकहाती विजय मिळविल्यानंतर शिवसेनेने क्षणाचाही विलंब न करता विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिक्षण संस्था चालविणाऱ्या दराडे यांची उमेदवारी आर्थिक निकषावर झाल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु, ते सेनेचे अधिकृत नव्हे, तर पुरस्कृत उमेदवार आहेत. स्वत: दराडे हे देखील टीडीएफचे पाठबळ असल्याचे सांगतात.

भुजबळांचे स्वीय साहाय्यक राहिलेले प्रा. संदीप बेडसे हे आपण राष्ट्रवादी आणि टीडीएफ आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा करीत आहे. टीडीएफचे आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत भाऊसाहेब कचरे, शालिग्राम भिरूड, अमृत शिंदे हेदेखील प्रचार करीत आहेत. टीडीएफमध्ये फूट पडल्याने मत विभाजन अटळ आहे. मागील निवडणुकीत तेच घडले होते. मविप्र शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी तथा भाजपचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या अपक्ष उमेदवारीने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती. परंतु, दादा बधले नाहीत. अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांचे वाद चव्हाटय़ावर येत आहेत. यामुळे भाजपातही फूट पडली आहे.

५३ हजार मतदार

नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्हय़ांत पसरलेल्या मतदारसंघात प्रचार करणे उमेदवाराची दमछाक करणारे ठरते. जिल्हानिहाय सक्षम प्रचार यंत्रणा उभारताना कस लागला. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर रसद मिळाली. शिवाय, संस्थाचालकांनी आपली शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फौज प्रचारात जुंपली. विखुरलेल्या ५३ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार नानाविध शक्कल लढवीत आहेत. भ्रमणध्वनीवर संपर्क साधून स्थानिक पातळीवर बैठकांचे आयोजन सुरू आहे. साग्रसंगीत भोजनावळी उठत आहेत. एकेका मताला काही हजारांचे मोल आल्याचे बोलले जाते. महिला मतदार आणि पुरुष मतदारांच्या पत्नीसाठी पैठण्यांची भुरळ पाडली जात आहे. या प्रचार तंत्राने ही निवडणूक इतर निवडणुकांप्रमाणे भासत आहे. शिक्षक हादेखील एक माणूसच असल्याचा ‘अर्थ’ वेगवेगळ्या बाबीतून उलगडत आहे. एकूण मतदारांमध्ये सर्वाधिक १४,८७३ मतदार नाशिक जिल्ह्य़ात आहेत. त्या खालोखाल नगर, जळगाव, धुळे, नंदुरबारचा क्रमांक लागतो. नगरमधून सात, नाशिकमधील पाच, धुळ्यातून तीन तर जळगावमधून एक उमेदवार मैदानात आहे. जिल्ह्य़ाच्या अस्मितेचा मुद्दा प्रचारात आला आहे. टीडीएफ आणि भाजपमधील बंडखोरी तसेच जिल्हानिहाय उमेदवार यामुळे होणारे विभाजन नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालातून समजणार आहे.