News Flash

Nashik election 2017: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

पहिल्या यादीत ५४ जणांचा समावेश, महापौर अशोक मुर्तडक यांना पहिल्या यादीत स्थान नाही

संग्रहित

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात उशीर होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित करत इतर पक्षांना मागे टाकले आहे. पहिल्या यादीत ५४ जणांचा समावेश असून यामध्ये पक्षाच्या आठ नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपमधून मनसेत दाखल झालेल्या महिला उमेदवारालाही उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले, नगरसेवक यशवंत निकुळे, सुजाता डेरे व रेखा बेंडकोळी यांची नावे पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मनसेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृह नेत्या सुरेखा भोसले, गटनेता अनिल मटाले, मेघा साळवे, सविता काळे, कांचन पाटील, अर्चना जाधव, तसेच स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपातून काही दिवसांपूर्वीच मनसेत प्रवेश केलेल्या विद्यमान नगरसेवक ज्योती अर्जुन गांगुर्डे यांना प्रभाग ३ मधून संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे दोन माजी नगरसेवक अस्लम मणियार व बाळासाहेब मटाले यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी यांनाही संधी मिळाली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही यादी जाहीर केलेली नाही. यादी जाहीर होताच तिकिट न मिळालेले इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पक्षांकडून यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. निवडणुकीसाठी वर्षभर मेहनत घेतलेल्या इच्छुक उमेदवारांचे आज काय होते याचे चित्र आज स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 11:01 am

Web Title: nashik election 2017 mns declared first list of candidates
Next Stories
1 बंडाच्या धास्तीने थेट ‘एबी’चा उतारा
2 जिल्ह्यतील १३६ केंद्रांवर आज पदवीधरसाठी मतदान
3 जिल्ह्य़ात पोलीसांची शालेय तपासणी मोहीम
Just Now!
X