मतमोजणी प्रक्रियेतील कथित गडबड

महापालिका निवडणुकीत केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने सत्तेचा गैरवापर करून सोयीची प्रभाग रचना करण्यासह मतमोजणी प्रक्रियेत गडबड केल्याचा आरोप करीत भाजप वगळता इतर पराभूत उमेदवारांनी न्यायासाठी याचिका दाखल करण्यासह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी येथील हुतात्मा स्मारकात भाजप वगळता इतर सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांची बैठक झाली. पुरोगामी लोकशाही आघाडीचे समन्वयक डॉ. संजय अपरांती, विलास देसले, माकपचे नेते डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पराभूत सर्वच उमेदवारांचा प्रामुख्याने भाजपवर रोष होता. अनेकांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड गेले. विलास देसले यांनी बैठकीचा उद्देश मांडतांना महापालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय यंत्रणा विकली गेल्याचा अनुभव आल्याची तक्रार केली. मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्व आपले नाव वगळण्यात आले. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यावर त्यांनी निर्देश देऊनही यादीत नाव नोंदणी करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय उपस्थित सर्वच उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी आपल्या अनुकूल केल्याची तक्रार केली. मतदान यंत्रांमध्ये गडबड करण्यात आल्याने झालेले मतदान आणि मतमोजणीत दर्शविण्यात येणारे मतदान यांत तफावण असणे, मतदारांना पैशांचे वाटप, पुनर्मतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावणे, एका प्रभागातील मतदारांनी नावे दुसऱ्या प्रभागात असणे, गुंडांना भाजपकडून उमेदवारी वाटप, बनावट मतदान अश्या तक्रारी करण्यात आल्या.

मतदानानंतर मतपेटय़ा ठेवण्यात आलेल्या ठिकाणाभोवती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा पहारा असणे आवश्यक असताना नाशिकमध्ये संरक्षणाची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर सोपविण्यात आल्याबद्दल डॉ. अपरांती यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका निवडणुकींमध्ये याआधी असे झालेले नव्हते, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा गोंधळामुळे लोकशाहीलाच धोका निर्माण झाला असून लोकशाही वाचविण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या लक्षात हे प्रकार आणून देण्यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने याचिका दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. २८ फेब्रुवारीपर्यंत सर्वानी निवडणूक प्रक्रियेतील गडबडीविषयी आपल्याकडील पुराव्यासह लेखी स्वरूपात तक्रारी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. या समितीत ३५ जणांसह प्रत्येक प्रभागातील दोन प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून तक्रारी जमा झाल्यावर अ‍ॅड. प्रशांत भूषण यांच्याशी याचिका दाखल करण्यासंदर्भात संपर्क साधण्यात येणार आहे. दुसरीकडे तीन मार्च रोजी सकाळी १० ते एक या वेळेत शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस अशोक सातभाई, जयंत मोरे, संजय चव्हाण, प्रभाकर पाळदे आदी उमेदवारांसह मिलींद वाघ, दिनेश सातभाई आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांनी मतमोजणी प्रक्रियेत कोणताही घोळ झाला नसल्याचे स्पष्ट करीत प्रभाग क्रमांक एक ते तीनची मतमोजणी सुरळीत झाल्याचे नमूद केले. मतदार केंद्रांवर झालेले मतदान व मतमोजणीमध्ये निश्चित झालेले मतदान हे सारखेच होते. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया नियमानुसार पार पाडून प्रभाग क्रमांक तीनचा निर्णयही लगेचच घोषित करण्यात आलेला होता.

प्रभाग क्रमांक ३० मध्येही गडबड झाल्याची समाज माध्यमात चर्चा होती. परंतु, साहित्य वाटपवेळी मतदान केंद्राध्यक्षांना सदर मतदान यंत्र बदलून दिल्याच्या नोंदीही असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे.