News Flash

पुन्हा निवडणुकीसाठी पराभूत उमेदवारांचे आंदोलन

सदोष मतदार याद्या तयार करत त्यात स्वतच्या फायद्यानुसार फेरफार केले गेले.

शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करताना पराभूत उमेदवार.

महापालिका निवडणुकीत इव्हीएम यंत्र आणि मतदार यादीच्या गोंधळ झाल्याने त्याची सखोल चौकशी करुन निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबविण्याच्या मागणीसाठी  शुक्रवारी लोकशाही बचाव आंदोलन समितीने धरणे आंदोलन शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ  करण्यात आले.

डॉ. संजय अपरांती, डॉ. डी. एल. कराड, समाधान भारती, विलास देसले आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शिष्ट मंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

महापालिका निवडणुकीत इव्हीएम यंत्राचा वापर व्हीव्ही पॅट न जोडता केला गेला, या यंत्रातही काही घोळ केला गेला, मतदार यादीच्या गोंधळावरून पालिका जिल्हा प्रशासनावर जबाबदारी ढकलत आहे, निवडणुकीसाठी भाजपने सत्तेचा वापर केला, असा आरोप समितीने यावेळी केला.    आचारसंहिता काळात भाजप नेत्यांच्या कार्यशैलीवर आंदोलकांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनावर टिकास्त्र सोडले. सदोष मतदार याद्या तयार करत त्यात स्वतच्या फायद्यानुसार फेरफार केले गेले.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय मतदार याद्यातील गोंधळाची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक रद्द करून कागदी मतपत्रिकांच्या सहाय्याने फेर निवडणूक घेण्याची मागणी समितीने केली आहे.  आंदोलनात पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. नंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले. तेव्हा जिल्हाधिकारी नसल्याने त्यांनी दालनाबाहेर ठिय्या दिला.

आंदोलकांचे आरोप

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी इव्हीएमचा वापर व्हीव्हीपॅट न जोडता करण्यात आला. त्या यंत्रात घोळ करत कोणतीही कळ दाबली तरी अगोदर ठरलेल्या उमेदवाराला मत जावे, अशी व्यवस्था प्रशासनाने सत्ताधाऱ्यांनी केल्याची तक्रार समाधान भारती यांनी केली. निवडणूक काळात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी आदर्श आचार संहितेचा सातत्याने भंग केला. जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याचे विधान करत मतदारांवर प्रभाव टाकला. सिन्नरच्या सभेत सिन्नरच्या विकासासाठी हवी ती रक्कम टाका, कोऱ्या नामनिर्देशित पत्रावर स्वाक्षरी देतो ही आश्वासने आचारसंहितेचा भंग करणारे असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. भाजपने मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहिरातबाजीत केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे दिलेला नाही. आयोगाने दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आले आदी आरोप लोकशाही बचाव आंदोलन समितीने केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:56 am

Web Title: nashik elections 2017 4
Next Stories
1 समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांना फसवून संमती मिळविण्याचा प्रयत्न
2 महापौर-उपमहापौरपदासाठी मोर्चेबांधणी
3 प्रादेशिक परिवहनच्या कामकाजावर सीसी टीव्हीची नजर
Just Now!
X