एबी फॉर्मचा गोंधळ, हाणामारी, कथित आर्थिक व्यवहारांच्या ध्वनीफिती आणि प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभांमुळे ढवळून निघालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी १४०७ केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. रिंगणात एकूण ८२१ उमेदवार असून त्यामध्ये ३२५ महिला आहेत. मतदारांची संख्या १० लाख ७३ हजार ४०७ आहे. मतदानासंबंधीची प्रक्रिया निवडणूक यंत्रणेने सोमवारी पूर्णत्वास नेली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, आर्थिक स्थिती आणि दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती पहावयास मिळणार आहे.

मतदानाची धुरा एकूण ७ हजार ७४५ क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधितांना मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी काही यंत्रांची बॅटरी उतरल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांनी ती योग्य पध्दतीने बंद न केल्याने असे काही प्रकार घडले. परंतु, अशा यंत्रांसाठी नवीन बॅटरी उपलब्ध करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्राकडे रवाना झाले. शहरातील केंद्र १० किलोमीटरच्या परिघात असल्याने दुपारनंतर सर्व केंद्रावर मतदानाशी निगडीत पूर्वतयारीचे कामकाज सुरू झाले. महापालिकेच्या २० जागांवर १० किंवा त्यापेक्षा अधिक तर दहा जागांवर तीन किंवा त्यापेक्षा कमी उमेदवार आहेत. मतदानासाठी ४५७८ बॅलेट युनिट तर १५४९ कंट्रोल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. मतदानावेळी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये म्हणून प्रत्येक केंद्रावर राखीव मतदान यंत्राची उपलब्धता करण्यात आली आहे. मतदान केंद्रांबाहेर दुपारपासून त्या त्या प्रभागातील उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीचे फलक झळकण्यास सुरूवात झाली.  महापालिका निवडणुकीत २७९ केंद्र संवेदनशील, ८६ अतीसंवेदनशील तर ७७ केंद्र ही ७७ ‘क्रिटीकल’ आहेत. या केंद्रांवर अधिक सजगता बाळगली जाणार आहे. जादा पोलीस बंदोबस्त आणि मतदान केंद्र परिसरातील घडामोडींचे छायाचित्रण केले जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महाालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून सर्वात कमी केंद्र म्हणजे ३१ केंद्र ही प्रभाग दहामध्ये आहेत. मतदानासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार ओळखपत्रा व्यतिरीक्त इतर ओळखपत्रही सादर करता येतील. त्यात पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन ओळखपत्र, शासकीय व खासगी ओळखपत्र, बँक खात्याचे पुस्तक आदींचा समावेश आहे.

पक्षनिहाय उमेदवार

निवडणुकीत भाजपचे ११९, शिवसेना ११२, मनसे ९७, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४१, बसपा ३२,  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्‍सवादी) १४,  कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया दोन, एमआयएम नऊ, समाजवादी पार्टी तीन, भारीप बहुजन महासंघ १४, जनसुराज्य व भारतीय जनहित काँग्रेस पार्टी प्रत्येकी एक, धर्मराज्य पक्ष ११, संभाजी ब्रिगेड, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया प्रत्येकी दोन, भारतीय संग्राम परिषद व बहुजन विकास आघाडी प्रत्येकी सहा, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तीन, रिपाइं (धर्मनिरपेक्ष) चार, रिपाइं (आठवले गट) आठ या पक्षांसह २७५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

असे करावे मतदान..

चार सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने चार मते देणे आवश्यक आहे. तीन सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने तीन मते देणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागातील सर्व जागांवरील एकूण उमेदवारांच्या संख्येनुसार बॅलेट युनिटवर अनुक्रमे अ, ब, क आणि ड जागेची मतपत्रिका असेल. त्या अनुषंगाने मतपत्रिका अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिका गुलाबी, क जागेसाठी फिका पिवळा व ड जागेसाठी फिका निळा असेल. मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व चिन्ह असेल. प्रत्येक जागेसाठी पसंतीच्या उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतर लाल दिवा लागल्यावर त्या जागेसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. याच पध्दतीने चारही जागांसाठी मते दिल्यानंतर बझर वाजेल. म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल.