निवडणुकीआधी गुंडांना प्रवेश दिल्यामुळे आणि नंतर तिकीट वाटपात झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांवरून सर्वाच्या टिकेचे लक्ष्य ठरलेल्या भाजपने नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्तेला सुरुंग लावताना शिवसेनेसह सर्वपक्षीयांना धोबीपछाड देत एकहाती सत्ता काबीज करण्याची किमया साधली. या निवडणुकीत मनसेने राज्यातील एकमेव सत्तास्थान गमावले. प्रारंभी बरीच हवा करणाऱ्या शिवसेनेची इतकी वाईट अवस्था झाली की, कित्येक प्रभागात त्यांचे उमेदवार भाजपशी स्पर्धा देखील करू शकले नाहीत. कधीकाळी शिवसेना आणि नंतर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले गेलेले नाशिक या निकालाने भाजपचा बालेकिल्ला म्हणून परावर्तीत झाले आहे.

शहरातील नाशिक पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीनही विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. महापालिका निवडणुकीतील यशापयश पुढील निवडणुकांवर परिणाम करणारे ठरेल हे लक्षात घेत भाजपची मंडळी कार्यप्रवण झाली. तिकीट वाटपात आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर्गत धुसफूस, त्यातून अनेक प्रभागात झालेली बंडखोरी आणि कथित आर्थिक व्यवहाराच्या चित्रफिती या घटनाक्रमाने भाजप बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु, त्याचा पक्षीय कामगिरीवर तसूभरही परिणाम झाला नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत नाशिक आपणास दत्तक देण्याच्या केलेल्या आवाहनाला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे निकाल दर्शवितो. सत्तेचे वलय, अहिराणी भाषिक पट्टय़ासह सर्व स्तरातून मिळालेल्या प्रतिसादाने नाशिककरांनी प्रदीर्घ काळानंतर एकाच पक्षाच्या हाती पालिकेची सत्ता सोपविली. महापालिकेतील सत्ताधारी मनसेचा पुरता धुव्वा उडाला. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नाविण्यपूर्ण प्रकल्प साकारणाऱ्या राज ठाकरे यांचे इंजिन पाच जागांपुढे धावले नाही. गतवेळी ४० जागा मिळविणाऱ्या मनसेची अवस्था निवडणुकीआधीच बिकट झाली होती. २७ विद्यमान नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे नवख्या उमेदवारांच्या सोबतीने रिंगणात उतरणाऱ्या मनसेला मतदारांनी पूर्णपणे नाकारले. राज यांची जादुही चालली नाही. मनसेप्रमाणे शिवसेनेची अवस्था झाली. या पक्षाच्या तिकीट वाटपाची झळ आधीच दहा जणांना बसली होती. पक्षांतर्गत हाणामारी आणि बंडखोरांमुळे पक्षाला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. काँग्रेस व राष्ट्रवादी अस्तित्वासाठी झगडत होते. कारागृहात असणारे छगन भुजबळ यांची अनुपस्थिती तसेच विविध आरोपांमुळे राष्ट्रवादी आधीच गलीतगात्र झाली होती. त्याचे प्रतिबिंब निकालातही दिसून आले.