ऐन दिवाळीत तापमान खाली घसरण्यास सुरुवात झाली असून गुरुवारी पारा आणखी खाली घसरून १०.४ अंश या नव्या नीचांकी पातळीवर आला. तीन-चार दिवसांपासून तापमान कमी होत असल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हंगामाच्या प्रारंभीच कमालीचा गारठा पसरल्याने दिवाळीच्या उत्साहात भर पडली आहे. दुसरीकडे करोनाकाळातील थंडी सर्दी, खोकल्यासारख्या विकारांना निमंत्रण देणारी ठरण्याची धास्ती आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा कडाका अधिक जाणवतो. गारव्यापासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटण्यास सुरुवात होऊ लागली आहे.

मागील काही वर्षांपासून ऋतुमानात बदल होत असून त्याचे प्रत्यंतर या हिवाळ्यातही येत आहे. यंदा हंगामात वातावरणात आमूलाग्र बदल झाले आहेत.

पावसाळ्याचा हंगाम इतका लांबला की, ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखाही फारसा बसलाच नाही. हा महिना संपत नाही, तोच नोव्हेंबरच्या प्रारंभापासून गारवा जाणवायला लागला. या महिन्याच्या पूर्वार्धातच नीचांकी पातळी गाठली गेली. बुधवारी १०.६ असणारे तापमान गुरुवारी १०.४ अंशावर आले.

तीन-चार दिवसांपासून तापमान कमी होत असल्याने दीपोत्सवात थंडीची लाट येते की काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. गारठय़ामुळे सकाळी, रात्री घराबाहेर पडणाऱ्यांना उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत.

उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. मागील काही हंगामातील नोंदी पाहिल्यावर दिवाळीनंतर गारवा जाणवायला लागतो आणि डिसेंबर, जानेवारीत कडाक्याची थंडी पडते. याच काळात तापमान नीचांकी पातळी गाठते. थंडीची लाट येते. यंदा मात्र हा सर्व घटनाक्रम महिनाभर आधीच सुरू झाला आहे. सध्या करोना संकट कायम आहे. वाढत्या थंडीमुळे या संकटासह इतरही आजारांना आमंत्रण मिळण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला देण्यात येत आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे. निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर ८.५ अंशाची नोंद झाली. हवामानशास्त्र विभागाचे ग्रामीण भागात केंद्र नाही. ग्रामीण भागातील अन्य संस्थांच्या नोंदी ते गृहीत धरत नाहीत. ग्रामीण भागात दिवाळीत कडाक्याच्या थंडीची अनुभूती घेण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोटींचा आधार घेतला जात आहे. ही स्थिती कायम राहिल्यास द्राक्ष मण्यांना तडे जाणे, पाने-मुळांचे काम मंदावणे असे प्रकार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गहू, कांदा, हरबरा पिकांसाठी ही थंडी पोषक असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगतात.

अधिक काळ थंडीची अनुभूती मिळणार

२०१९ च्या थंडीच्या हंगामात १७ जानेवारी रोजी ६.५ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. २०१८ च्या हंगामात २५ जानेवारी रोजी ७.२ अंश तर त्याआधी म्हणजे २०१७ च्या हंगामात ११ जानेवारीला ५.८ अंश या नीचांकी तापमानाची नोंद आहे. मागील तीन हंगामात नीचांकी पातळी गाठण्याचा काळ जानेवारी, फेब्रुवारी असल्याचे लक्षात येते.

२०२० या वर्षांचा हंगाम त्यास अपवाद ठरला. नोव्हेंबरमध्ये तापमान १० अंशापर्यंत खाली आल्यामुळे यंदा अधिक काळ थंडीची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे.