21 October 2018

News Flash

पुरेशा मनुष्यबळाअभावी अग्निशमन दल संकटात

..आता स्वयंचलीत शिडीही तोकडी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नाशिकला स्मार्ट करण्यासाठी वेगवेगळ्या योजना साकारण्याची धडपड महापालिका करीत असली तरी दुसरीकडे शहराच्या वाढत्या पसाऱ्यात आग, नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत जलदगतीने प्रतिसाद देणारी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याकडे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे उघड होत आहे. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सहा महिन्यात निवृत्त होत आहे. दलातील उपमुख्य अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी अशी महत्वाची पदे रिक्त आहेत. २०११ च्या लोकसंख्येचा विचार करता निकषानुसार अग्निशमन दलास सुमारे ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ गरजेचे असताना सद्यस्थितीत केवळ १५५ अधिकारी-कर्मचारी हा डोलारा सांभाळत आहे.

मागील काही दिवसात घडलेल्या आगीच्या घटनांमधून अग्निशमन दलाचे सशक्तीकरण गरजेचे असल्याची बाब ठळकपणे समोर आली. अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह सहा विभागात जलद प्रतिसादासाठी स्वतंत्रपणे केंद्र कार्यान्वित आहेत. मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम चालत असले तरी तुटपुंजे मनुष्यबळ हा दलासमोरील सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. १९९४ मध्ये तेव्हाची लोकसंख्या लक्षात घेऊन मंजूर झालेल्या पदांवर आजही या विभागाचे कामकाज चालते. त्यातही महत्वाची पदे रिक्त असल्याने अस्तित्वातील मनुष्यबळावर अतिरिक्त कामांचा बोजा पडला आहे. २३ वर्षांत शहराच्या लोकसंख्येत कमालीची वाढ झाली. २०११ मधील जनगणनेचा विचार करता अग्निशमन दलाच्या निकषानुसार अधिकारी, कर्मचारी, चालक अशी एकूण ५२५ जणांची आवश्यकता आहे. पाच वर्षांनंतरची म्हणजे सध्याची लोकसंख्या गृहीत धरल्यास हा आकडा आणखी किमान २०० ने वाढू शकतो. तथापि, त्याच्या एक चतुर्थाश मनुष्यबळावर दल काम करीत आहे. पुढील सहा महिन्यात मुख्य अग्निशमन अधिकारी निवृत्त होत आहे. या काळात उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना अग्निशमन दलाच्या कामकाजाचे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेता आले असते. शहराच्या एकंदर स्थितीचा अभ्यास झाला असता. परंतु, उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्याची पदे रिक्त असल्याने सहा महिन्यानंतर दलाची अवस्था अधांतरी बनणार असल्याची साशंकता व्यक्त केली जाते. तातडीचा उपाय म्हणून प्रशासन मुख्य अग्निशमन अधिकारी हे पद परसेवेतून भरणार असल्याचे सांगितले जाते. परसेवेतून येणारा अधिकारी एकंदर स्थितीविषयी अनभिज्ञ असल्याची शंका दलातील काही जण व्यक्त करतात.

साधन सामग्रीची अग्निशमन दलाकडे कमरता नाही. पाण्याचे बंब, फोमचा मारा करणारी यंत्रणा वा तत्सम स्वरुपाची सामग्री आहे. ३० मीटर उंचीची स्वयंचलीत शिडी देखील आहे. त्यातील काही सामग्री परदेशी बनावटीची असून ती घेऊन आठ ते दहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. या उपकरणांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती होत नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा मुद्दाही विभागाकडून प्रशासनासमोर मांडला गेला. आग सुरक्षा निधीच्या लेखा परीक्षणात मध्यंतरी अग्निशमन दलाचे लेखा परीक्षण झाले होते. त्यावेळी आग सुरक्षा निधीत दहा वर्षांत वाढ केली नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. ठाणे, पुणे महापालिकांच्या धर्तीवर आग सुरक्षा निधीत वाढ करून पालिकेच्या उत्पन्नात दोन कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक नियमान्वये या रकमेतून दलात सुधारणा करण्यासाठी अत्यावश्यक साधन सामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भविष्यात वापरता येईल.

..आता स्वयंचलीत शिडीही तोकडी

महापालिका हद्दीत ४५ ते ७० मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना परवानगी मिळत असल्याने अग्निशमन दलाकडील ३० मीटर उंचीची शिडी उपयोगी ठरणार नाही. ज्या उंचीच्या इमारती आहेत, किमान त्या उंचीची आग विझविणारी आणि सुटका करणारी यंत्रणा अग्निशमन दलाकडे असावी लागते. स्मार्ट रोड, गोदावरी नदीकाठावरील सुशोभिकरण, संगीतमय कारंजा अशा दृश्य स्वरुपात आकर्षक ठरतील अशा प्रकल्पांची चढाओढ लागली आहे. परंतु, नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत महत्वाच्या ठरणाऱ्या अग्निशमन दलाच्या सद्यस्थितीकडे कारभाऱ्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

First Published on January 6, 2018 2:17 am

Web Title: nashik fire brigade in bad condition due to lack of upgrade equipment