सिडको परिसरातली घटना, वातावरणात तणाव
शहरात टोळीयुध्दाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून गुरूवारी दुपारी सिडको परिसरात दोन गटांत झालेल्या जोरदार हाणामारीत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत पसरली. मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. काहींनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असला तरी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
सिडको परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टी येथे काही दिवसांपूर्वी काळे-दांडेकर आणि गायकवाड यांच्यात वादामुळे हाणामारी झाली होती. यावरून संबंधितांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी गायकवाड आणि काळे कुटुंबातील संशयितांची धरपकड करत त्यांना जेरबंद केले. त्याचा राग गायकवाड कुटुंबियांच्या मनात होता.
गुरुवारी अशोक दांडेकर व तात्या दांडेकर हे स्टेट बँक चौकातील ‘महाराणी वाइन शॉप’ येथे दारू पिण्यासाठी आले होते. ही माहिती कळताच गायकवाड यांच्या कुटुंबातील काहीजण तिथे आले. त्यांनी दांडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. तेथे जोरदार हाणामारी सुरू होताच भेदरलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. हल्लेखोर फरारी झाल्यानंतरही अर्धा तास अशोक व तात्या दांडेकर तिथे पडून होते. या हल्ल्यात अशोक हे जागीच ठार झाले तर तात्या गंभीर जखमी झाले.
याची माहिती समजल्यानंतर दांडेकर कुटुंबिय व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत बिअरबार तोडण्याचा प्रयत्न केला. लाकडी दांडके घेऊन त्यांनी तोडफोड केली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी धाव घेऊन स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अशोक यांचा मृतदेह तसेच जखमी तात्या दांडेकर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी तिथेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.