शहरातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाही गुन्ह्य़ांमध्ये भर पडतच असून शनिवारी मध्यरात्री उपेंद्रनगर परिसरात संशयितांच्या गोळीबारात जखमी झालेल्या अजिंक्य चव्हाण (२५) या तडीपार गुंडाचा उपचार सुरू असताना रविवारी दुपारी मृत्यू झाला.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उपेंद्रनगर भागातील एका इमारतीच्या पाठीमागे चार ते पाच जण जमले होते. त्यापैकी एकाने अजिंक्य चव्हाण याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत चव्हाण यास रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास चव्हाणचा मृत्यू झाला. चव्हाण याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असून जानेवारीमध्ये त्यास तडीपार करण्यात आले होते.

चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सर्व संशयित सिन्नर तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.