इगतपुरीत १४१ मिमी पाऊस

शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर कायम राहिल्याने शहर परिसरासह जिल्ह्य़ात यंदा प्रथमच पावसाळा सुरू झाल्याची अनुभूती नागरिकांना आली आहे. इगतपुरी, हरसूल या भागात पावसाचा जोर अधिक असल्याने नदी-नाले यंदा प्रथमच खळाळून वाहू लागले. नाशिक शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या गंगापूर धरण क्षेत्रात म्हणजेच त्र्यंबकेश्वर परिसरातही दिवसभर पावसाने ठाण मांडल्याने आठवडय़ातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहण्याचे संकट उभे ठाकलेल्या नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्ह्य़ातही काही भागात दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्य़ातील देवळा आणि चांदवडचा अपवादवगळता यंदाच्या पावसाळ्यात कुठेच पावसाने जोमदार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे पेरण्यांचे प्रमाणही केवळ एक टक्क्य़ावरच अडून राहिले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. हा जलसाठा १५ ते २० दिवसच पुरणार असल्याने शहराला आठवडय़ातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशी स्थिती असतानाच शनिवारी सायंकाळपासून शहरासह जिल्ह्य़ातील इगतपुरी, हरसूल, त्र्यंबकेश्वर, निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी या भागात पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर संततधार सुरू राहिल्याने अंबड एमआयडीसीतील दत्तनगरसह सिडको, पंचवटीतील काही भागात घरांमध्ये पाणी शिरले. इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इगतपुरीत २४ तासात रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत १४१ मिमी, तर घोटी परिसरात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घोटी, इगतपुरी, काळुस्ते, मानवेढे, टाके, बोरटेंभे व वैतरणा परिसरातील शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे भाम, भावली, दारणा या नद्यांना अधिक प्रमाणात पाणी आले आहे. पावसामुळे भावली धरणात नऊ, तर दारणा धरणात पाच टक्के जलसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. वाकी धरण परिसरात दुपारी दोनपर्यंत ९० मिमी पाऊस झाला. शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने भात लागवडीचे काम जोमात सुरू झाले. नंदुरबारमध्येही दिवसभर पाऊस सुरू होता. जळगाव जिल्ह्य़ातील चोपडा, भुसावळ तालुक्यात दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपले.