21 January 2021

News Flash

Coronavirus : रुग्ण बरे होण्याचा नाशिकचा दर चांगला

पालकमंत्र्यांकडून करोनास्थितीचा आढावा

प्रतिकात्मक छायाचित्र

पालकमंत्र्यांकडून करोनास्थितीचा आढावा

नाशिक : जिल्ह्य़ात प्राणवायूची व्यवस्था असणाऱ्या खाटांची सर्वत्र व्यवस्था आहे. प्रत्येक गल्ली-बोळात जलद प्रतिजन चाचण्या होत असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढत असले तरी देशात नाशिकचा रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे, असा दावा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

सोमवारी जिल्ह्य़ातील करोनास्थितीचा भुजबळ यांनी आढावा घेतला. प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील २४ हजार ३०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के आहे. सद्य:स्थितीत जवळपास पाच हजार रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती मांडण्यात आली. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्राणवायूची व्यवस्था असणाऱ्या खाटांची गरज भासते. या खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत; परंतु तालुकानिहाय प्राणवायूची व्यवस्था असणाऱ्या खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाचा आलेख उंचावण्यामागे जलद प्रतिजन चाचण्यांची वाढलेली संख्या हे कारण आहे.

या चाचण्या मोठय़ा संख्येने होत असल्याने करोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. निधीच्या उपलब्धतेवरून काँग्रेस आमदार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे नमूद केले. तीन पक्षांचे सरकार असल्याने कोणी तरी नाराज होणार; परंतु महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्दय़ावर हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. अध्यक्ष कोणीही होवो, काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. अभिनेता सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे केला हे चांगले झाले. नाही तर मुंबई पोलिसांनी कितीही चांगले काम केले असते तरी ते कुणाला तरी वाचवत आहेत, असाच आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले.

७६८ जणांचा मृत्यू

जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या ३० हजारांपार गेली असून आतापर्यंत ७६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार ३०७ रुग्ण बरे झाले. सद्य:स्थितीत चार हजार ९३४ जणांवर उपचार सुरू आहेत. यात सर्वाधिक २७५२ रुग्ण नाशिक शहरात असून मालेगाव महापालिका क्षेत्रातील ७१४ रुग्ण आहेत.  नाशिक ग्रामीणमध्ये १४५८ रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक तालुका २४०, चांदवड ४४, सिन्नर २२०, दिंडोरी ४९, निफाड २७०, देवळा ५६, नांदगाव ११३, येवला २८, त्र्यंबकेश्वर २१, सुरगाणा सहा, पेठ दोन, कळवण २३, बागलाण १३४, इगतपुरी ७२, मालेगाव ग्रामीण १८० रुग्ण यांचा समावेश आहे. जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के आहे. यात नाशिक ग्रामीणमधील ७७.५३, नाशिक शहरात ८४.१५ टक्के, मालेगावमध्ये ६४.३६ टक्के, तर जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३१ टक्के आहे. करोनामुळे नाशिक शहरात ४२९, मालेगाव महापालिका क्षेत्रात १०५, नाशिक ग्रामीणमध्ये २१२ आणि जिल्ह्य़ाबाहेरील २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:00 am

Web Title: nashik has a good rate of covid 19 patient recovery zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 जिल्ह्य़ातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच
2 कांदा दरात २५० रुपयांनी घसरण
3 सैनिकीशाळेत दहावीतील गुणांनुसार प्रवेश
Just Now!
X