१५० ते २०० एकर जागेची मागणी

नाशिकच्या औद्योगिक पटलावर मोठी गुंतवणूक होत नसल्याने दाटलेले मळभ जिंदाल पॉलिफिल्मने दिंडोरी औद्योगिक वसाहतीत सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविल्याने काहीसे दूर होण्याची चिन्हे आहेत. गोंदे औद्योगिक वसाहतीत या कंपनीचा विशिष्ट प्रकारच्या फिल्म्सचे उत्पादन करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. वाढती मागणी लक्षात घेत जिंदालने दिंडोरी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तारीकरणासाठी १५० ते २०० एकर जागेची मागणी केली आहे. या प्रकल्पातून साधारणत: ३०० ते ५०० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा अंदाज आहे.

औद्योगिक वसाहतींमध्ये जागा शिल्लक नसल्याने नवीन उद्योग नाशिकमध्ये येत नसल्याची तक्रार औद्योगिक संघटनांकडून नेहमीच केली जाते. मागील काही वर्षांत बडय़ा उद्योगांकडून मोठी गुंतवणूक न होण्यामागे त्याचा दाखला दिला जातो. यामुळे नाशिकचा औद्योगिक विकास एका विशिष्ट मर्यादेत सीमित राहिला. औद्योगिक क्षेत्र विस्तारण्याकरिता जागेची निकड पूर्ण होणे महत्वाचे असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या एकंदर स्थितीत बी. सी. जिंदाल ग्रुपच्या जिंदाल पॉलिफिल्मने दिंडोरी औद्योगिक वसाहतीत विस्तारीकरणाची योजना आखली आहे. इगतपुरीच्या गोंदे औद्योगिक वसाहतीतील मुंढेगाव येथे जिंदाल पॉलिफिल्म प्रकल्प आहे. ‘बीओपीईटी’ आणि ‘बीओपीपी’ फिल्मचे देशात सर्वाधिक उत्पादन या प्रकल्पात होते.

२००६ मध्ये ९० हजार मेट्रिक टन असणारे उत्पादन २०१५-१६ मध्ये २१०००० मेट्रिक टनवर नेले. आपल्या प्रकल्पाचा आणखी विस्तार करण्यासाठी जिंदालच्या अधिकाऱ्यांनी दिंडोरी औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर १५० ते २०० एकर जागेची मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे केली आहे. या नव्या प्रकल्पात संबंधितांकडून सुमारे २०० ते ३०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्प विस्ताराद्वारे ३०० ते ५०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे ‘मऔविम’च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले.

दिंडोरी औद्योगिक वसाहत ३७२ हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असून त्यातील १८३ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले आहे. म्हणजे हे क्षेत्र सध्या ‘मऔविम’च्या ताब्यात आहे. ३० हेक्टर क्षेत्र बागायती असल्याने ते वगळण्यात आले. उर्वरित १६९ क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. दिंडोरी औद्योगिक वसाहतीत भूखंडांचे दर तीन हजार रुपये प्रति चौरस मीटर आहे. संबंधितांनी प्रस्तावित वसाहतीतील जवळपास निम्म्या जागेची मागणी करताना दरात काहीशी सवलत मागितल्याचे सांगितले जाते. जिंदाल पॉलिफिल्मचा प्रस्ताव ‘मऔविम’च्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. भूखंड दराशी निगडीत विषय धोरणात्मक बाब आहे. या संदर्भात तसेच जागेबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मध्यंतरी पतंजलीकडून जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र उभारण्याची तयारी दर्शविण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून जागा मागणीबाबत प्रस्ताव आलेला नाही.