ग्राहकांना समाधानकारक सेवा सुविधा पुरविण्यात नाशिक जिल्हा देशात पाचव्या स्थानावर तर राज्यात ‘बेस्ट झोन’मध्ये आहे. ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करत नव्या ग्राहकांना जोडण्यासाठी आकर्षक योजना व सवलती आणण्यात आल्या आहेत. यामध्ये भ्रमणध्वनीचे राष्ट्रीय स्तरावरील रोमिंग मोफत करण्यात आले असून रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत बीएसएनएलच्या लॅन्डलाइनवरून अमर्याद मोफत कॉल करण्याची सुविधा देण्यात आल्याने ग्राहकांकडून याचा फायदा घेण्यात येत असल्याची माहिती बीएसएनएल नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक सुरेश प्रजापती यांनी दिली.

काही वर्षांपूर्वी ग्राहक बीएसएनएलच्या सेवा व योजनांवर नाराज होते. त्याविषयी अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. परंतु, सातत्याने त्यांचा निपटारा व पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. ग्राहकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न बीएसएनएलकडून होत आहे. यासाठी प्रत्येक सेवा केंद्रात ग्राहकांना अद्ययावत माहितीसह त्यांच्या अडचणी, सेवेतील त्रुटी याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्राहकांसाठी १९७ची असणारी सुविधा ही संगणकीकरणामुळे बंद झाली आहे. त्यास एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच बाजारपेठेचा अभ्यास करत ४ जी सेवा देण्यात येणार आहे. बीएसएनएलकडून ‘फ्री टू होम’ ही योजना सुरू करण्यात येत असून भ्रमणध्वनीवरून लँडलाइनवर वळविण्यात आलेले कॉल मोफत असून आवाजात सुस्पष्टता राहील. यासाठी कोणताही वाढीव बोजा ग्राहकांवर पडणार नसल्याचेही प्रजापती यांनी नमूद केले.

नवीन जोडणी आणि पुन्हा एकदा बीएसएनलच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन लँडलाइन, नवीन ब्रॉडबॅण्ड जोडणी, नवीन कोम्बो जोडणी, नव्याने जोडणी या सेवांचा २९ जुलैपर्यंत लाभ घेणाऱ्यांना जोडणी शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. तसेच इंटरनेट लीज्डलाइनच्या दरात ३० ते ७२ टक्के कपात करण्यात आली आहे. रमजान ईद महोत्सवात प्री-पेड ग्राहकांसाठी ७८६ रुपयांच्या कोम्बो व्हाऊचरमध्ये ६०० रुपयांचा टॉकटाइम, ७८६ एमबीडाटा, ७८६ एसएमएस हे देण्यात येणार आहे. ही सवलत सात जुलैपर्यंत सुरू राहील. याशिवाय फ्री सीम ऑफरसारख्या योजना आहेत. ग्राहकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रजापती यांनी केले आहे.