शहर काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीमुळे हादरले असून खून, लुटमार, मंगळसूत्र हिसकावून पलायन, विनयभंग आणि चोऱ्यांच्या घटना नित्याच्या झाल्या असल्याने नाशिककर हैराण झाले आहेत. याप्रश्नी आता राजकीय मंडळींनाही जाग आली असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीला त्वरित आळा घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भातील निवेदन ओबेरॉय आणि शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क प्रमुख भावना महाजन यांना दिले. निवेदनात  शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ होतांना दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. खून, अत्याचार, विद्यार्थिनी आणि युवतींची छेडछाड, विनयभंग, घरफोडी, वाहन चोरी, सोनसाखळी चोरी, चंदन चोरी, मद्यपि आणि टवाळखोरांचा उपद्रव, हाणामारी असे गुन्हे वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात दोन खून आणि बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी शहरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. उन्नाव आणि हैदराबाद येथील घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नाशिक शहरात वर्षभरात कौटुंबिक हिंसाचारापासून बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पाचशेपेक्षा अधिक गुन्हे नोंदविले गेले आहेत. महिलांच्या सुरक्षेविषयी शहरात निर्भया पथक कार्यान्वित झाले असून कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त असलेल्या विवाहितांसाठी स्वतंत्र महिला पथक आहे. महिलांची छेडछाड झाल्यास तत्काळ मदत मागण्यासाठी चार वेगवेगळे क्रमांक दिले जातात. या क्रमाकांवर संपर्क साधेपर्यंत गुन्हेगार व्यक्ती पळ काढतात. केंद्र सरकारने पैशांचे व्यवहार ऑनलाइन करण्यास प्रवृत्त केले असून ज्येष्ठांना यातील तांत्रिक माहिती नसल्याने त्यांची फसवणूक होत असल्याचे दिसते. सोनसाखळी चोऱ्याही वाढत आहेत.

वाहन चोरीच्या घटना शहरात दिवसाआड घडत आहेत. हाणामारीचे गुन्हे हे नित्याचे बनले असून किरकोळ कारणांवरून किंवा मागील कुरापत काढून हाणामाऱ्या होत आहेत. अनधिकृत चायनीज, अंडाभुर्जीच्या हातगाडय़ांवर रात्रीच्या वेळी बसणाऱ्या मद्यपि, टवाळखोरांचा उपद्रव कमी झाला. परंतु व्यावसायिक संकुलात रात्रीच्या अंधारात हे मद्यपि आणि टवाळखोर बसतात. शहरात राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्या गेल्या खऱ्या, परंतु गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकत असलेल्या गुन्हेगारांमुळे नवनवीन गुन्हे घडत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना शहराध्यक्ष गणेश पवार, गणेश गांगुर्डे, प्रवीण साळुंखे, सागर पाटील, गणपत पांचाळ, अनिल ठाकरे, बबन जाधव, मयांक मोरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रिक्षाचालकांची बेशिस्त

रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला केवळ आठवडय़ापुरता मोहीम राबवून लगाम बसणार नाही. त्यासाठी कुठेही आणि केव्हाही तपासणी होण्याची आवश्यकता आहे. आधी जाहीर करून तपासणी करण्याच्या पद्धतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि कागदपत्रे नसलेले रिक्षाचालक त्या कालावधीत रिक्षा रस्त्यावर आणतच नाहीत. त्यामुळे या तपासणीला कोणताच अर्थ राहत नसल्याची प्रतिक्रिया प्रामाणिक रिक्षाचालकांकडून व्यक्त होते. चोरी, खून आणि हाणामारीचे प्रकार तर कायमच होत असतात. किरकोळ कारणावरून एखाद्याला टोळीकडून मारहाण केली जाते. पोलिसांचा धाक नसल्याने असे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.