News Flash

कालिदास कला मंदिरच्या नूतनीकरणाचा भार वापरकर्त्यांवर

या नूतनीकरणात मात्र कला मंदिरातील आसन क्षमता २५० ने घटणार आहे.

नूतनीकरणानंतर महाकवी कालिदास कला मंदिरातील व्यासपीठ व प्रेक्षागृह असे असेल.

आसन क्षमता २५० ने घटणार

नाशिकच्या कला क्षेत्राला नवा आयाम देणाऱ्या महाकवी कालिदास कला मंदिरच्या नूतनीकरणासाठी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  मात्र,  या आधुनिकीकरणाचा बोजा प्रेक्षकांसह नाटय़ मंदिराचा वापर करणाऱ्या घटकांवर पडणार असल्याचे संकेत प्रशासनाने या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले. या नूतनीकरणात मात्र कला मंदिरातील आसन क्षमता २५० ने घटणार आहे.

महाकवी कालिदास कला मंदिरच्या बिकट अवस्थेविषयी कधी प्रयोग सुरू असताना जाहीरपणे तर कधी वैयक्तिक भेटीगाठीत कलावंतांनी तक्रारी मांडल्या. कलावंतांसह स्थानिक नागरिकांनी अपुऱ्या सोयीसुविधांबद्दल वारंवार आवाज उठविल्याने अखेर कला मंदिरच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या कामासाठी महापालिकेने दहा कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या पाश्र्वभूमीवर, बुधवारी कला मंदिरच्या आवारात पालिका प्रशासन, अखिल भारतीय नाटय़ परिषद, रंगकर्मी यांची एकत्रित बैठक पार पडली. या वेळी रंगकर्मीनी कला मंदिरच्या प्रेक्षागृहातील आवाज आणि प्रकाशयोजनेबाबत तसेच मोडक्यातोडक्या खुच्र्याची दुरुस्ती केली जात नसल्याच्या अनेक तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

या अत्याधुनिक बदलाचा फटका प्रेक्षकांसह नाटय़गृह भाडेतत्त्वावर घेणाऱ्या मंडळींवर पडणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा देताना पालिकेवर पडणारा आर्थिक भार या माध्यमातून वसूल होईल. महापालिकेने शुल्क वाढ करू नये. ध्वनी किंवा प्रकाशयोजनेत ज्या जादा वस्तू वापरल्या जातील, त्याचे शुल्क आकारावे अशी मागणी रंगकर्मीनी केली. मात्र शुल्कवाढ अटळ असल्याचे संकेत बैठकीत देण्यात आले. वाहनतळासाठी बी. डी. भालेकर मैदानावर ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. तक्रारी किंवा नूतनीकरणाबाबत असणाऱ्या अपेक्षा या प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी तीन दिवस कला मंदिरच्या आवारात सूचना पेटी बसविण्यात येणार आहे. संबंधितांनी आपल्या सूचना वा तक्रारी तपशिलासह लेखी स्वरूपात या ठिकाणी नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले. या वेळी महापालिकेचे अधीक्षक अभियंता जी. एम. पगारे, धीरज पाटील, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, शाहू खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नूतनीकरणातील बदल आणि सुविधा

नूतनीकरणानंतर ‘अ‍ॅकोस्टिक ध्वनी यंत्रणा’ बसविण्यात येणार असल्याने शेवटच्या खुच्र्यापर्यंत आवाज व्यवस्थित येईल. सर्व प्रेक्षागृह वातानुकूलित करण्यात येणार आहे. व्यासपीठाची रचना बदलण्यात येणार असून तेथे वापरण्यात येणाऱ्या पडद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच प्रकाशयोजना व सर्व तांत्रिक गोष्टी या यंत्राधारित असतील. रंगकर्मीना तयार होण्यासाठी देण्यात येणारी ग्रीन रूमही वेगळी असेल. कलावंतांच्या क्षुधाशांतीसाठी अल्पोपाहारगृह सुरू करण्याची व्यवस्था रंग मंदिरच्या आवारात करण्यात येणार आहे. नूतनीकरणात कला मंदिरातील आसन क्षमता आधीच्या तुलनेत २५० ने कमी होईल. दोन खुच्र्यामधील अंतर वाढविल्याने १२०० आसन क्षमता असलेल्या नाटय़ मंदिरात आता ९५० प्रेक्षकांसाठी आरामदायी खुच्र्या राहतील. स्वच्छतागृहातही बदल करत त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:24 am

Web Title: nashik kalidas kala mandir renovation issue
Next Stories
1 कांदा निर्यातीवर निर्बंध येण्याची चिन्हे
2 डिजे ऐवजी ‘ढोल-ताशा’
3 गोपीकृष्ण जयंती महोत्सवात ‘दी रिदॅमिक पॉईज’चा आविष्कार
Just Now!
X