नाशिकमधील अखेरची शाही पर्वणी सुखनैव पार पडल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेत सध्या परस्परांना शुभेच्छा देण्याची व अभिनंदन करण्याची नवीन पर्वणी सुरू झाल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या शासकीय विभागांचे कार्य कसे समाधानकारक ठरले, याचे दाखले देण्यात वरिष्ठ अधिकारी मागे नाहीत. सत्कारापासून ते कामांच्या समाधानाबाबत सर्वाकडून स्वत:ची पाठ स्वत: थोपटून घेतली जात आहे. पहिल्या पर्वणीत अतिरेकी बंदोबस्तावरून आगपाखड झाल्यावर नामानिराळे राहिलेले अनेक विभागांतील अधिकारी यशाचे श्रेय घेण्यासाठी आता धडपड करत आहेत.
जवळपास वर्षभर सिंहस्थ कामात मग्न राहिलेले जिल्हा व पालिका प्रशासन, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाशिकचे तिसरी शाही स्नान आटोपल्यानंतर मोकळा श्वास घेतला. अखेरच्या पर्वणीपर्यंत साधू-महंतांच्या नाकदुऱ्या काढण्यात अधिकाऱ्यांचा बराच वेळ खर्ची पडला. नित्य नव्या मागण्या आणि कामांवर आक्षेप घेणाऱ्या महंतांची समजूत काढताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलल्यामुळे समस्त अधिकारी वर्गात आनंदाला उधाण आले आहे. वास्तविक, कुंभमेळ्यातील लाखोंच्या गर्दीचे नियोजन आणि महत्वाची जबाबदारी एकटय़ा पोलीस यंत्रणेवर होती. पहिल्या पर्वणीत बंदोबस्तावरून आगपाखड झाल्यावर नियोजनातील अनेक विभाग कुंपणावर जावून बसले होते. पोलीस यंत्रणा लक्ष्य होत असताना एकही शासकीय विभाग त्यांच्या बचावासाठी पुढे आला नाही. पालकमंत्र्यांनी पहिल्या पर्वणीच्या नियोजनात पोलीस यंत्रणेची चूक झाल्याचे सांगून स्वत: नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला होता. पुढील दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीत मग काही फेरबदल केले गेले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ ते २० तास कार्यरत राहून बंदोबस्ताची धुरा सांभाळली. ऊन-पावसाची तमा न बाळगता त्यांनी साधू-महंतांबरोबर भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळली. पाण्यात बुडणाऱ्या भाविकांचे प्राणही वाचविले.
याबद्दल जिल्हा प्रशासन, महापालिका, महसूल आयुक्त वा अन्य शासकीय विभागांनी पोलीस यंत्रणेला यशाचे श्रेय दिल्याचे दिसले नाही. उलट कुंभमेळा यशस्वीततेत आपल्या यंत्रणेचे काम कसे सरस ठरले याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या कामाबद्दल महसूल आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केलेले समाधान त्याचे ठळक उदाहरण म्हणता येईल. तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी पालिकेच्या विभागीय कार्यालयात असणाऱ्या आपत्कालीन केंद्रात कर्मचारी वगळता कोणी जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे पहावयास मिळाले होते. असे असुनही या केंद्राला समाधानकारक कामाचे मिळालेले प्रशस्तीपत्रक आश्चर्यकारक म्हणता येईल. जिल्हा व पालिका प्रशासन सिंहस्थाच्या यशस्वीततेचे श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहे.
मात्र, त्यात ज्या पोलीस यंत्रणेमुळे लाखो भाविक स्नान करून सुरक्षितपणे आपापल्या घरी जाऊ शकले, त्यांचा नामोल्लेख केला जात नसल्याचे दिसत आहे. सर्व शासकीय विभागातील अधिकारी आपली पाठ आपणच थोपटून घेत आहेत. त्यात पोलीस यंत्रणेला बाजुला सारले गेल्याचे चित्र आहे.