लोकसत्ता प्राथमिक विभागीय फेरी

नाशिक : लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नाटय़गुणांना वाव देण्यासाठी किती फायदेशीर ठरत आहे, याचे दर्शन नाशिक विभागीय प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशीही घडले. महाकवी कालिदास कलामंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहात पहिल्या दिवसाप्रमाणेच मंगळवारीही एकांकिकांच्या विषयांचे नाविन्य, संहितांची मांडणी, महाविद्यालयीन लेखकांचा सामाजिक विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, हे दिसून आले. दुसऱ्या दिवशीही नाशिकसह उत्तर महाराष्टातील महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या.

संगीत या ठिकाणी..त्या ठिकाणी (हं.प्रा.ठा. कला महाविद्यालय) 

भाषण करतांना ‘या ठिकाणी, त्या ठिकाणी ‘ चा घोष करणारे राजकीय नेते, गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांंची धावपळ, नेत्यांची चमकोगिरी आणि या प्रकाराची सवय झालेली जनता यांचे चित्र ‘संगीत या ठिकाणी..त्या ठिकाणी’ या एकांकिकेत करण्यात आले आहे. राज्यकर्त्यांंकडून मिळेल त्या पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी केला जाणारा आटापिटा, राजकारणात सेक्युलर या शब्दाला समान अर्थी असणारे नेत्यांचे सर्वपक्षसमभावाचे राजकारण, यामुळे मतदारांना येणारी हतबलता आणि लोकशाहीची गळचेपी मांडण्यात आली. त्यासाठी भारुड, गोंधळ या लोकसंगीताचा आधार घेण्यात आला. दीड महिन्यात राज्याने जे अनुभवले, सोसले यावर परखड टिका विद्यार्थ्यांनी केली आहे.

नि:शस्त्र योद्धा (एस.व्ही.के. टी. महाविद्यालय)

महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान, त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम या शस्त्रांचा वापर करून इंग्रजांशी दिलेला लढा, त्यातून उभे राहिलेले असहकार आंदोलन एकांकिकेद्वारे उभे केले आहे. यामध्ये इंग्रजांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी उगारलेले बहिष्काराचे शस्त्र , स्वदेशी चळवळ दाखविण्यात आली असून गांधीजींच्या प्रेरणेमुळे जात—पात-धर्म विसरून लोक एकत्र आले. कोणत्याही शस्त्राचा वापर न करता इंग्रज सत्तेला हैराण केले. चौरीचौरा प्रकरणात शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर केलेला गोळीबार गांधीजीच्या अनुयांयाची संयमाची परीक्षा पाहणारे ठरले. काहींचा संयम सुटल्याने त्यांनी चौरीचौरा पोलीस ठाणे जाळले. यामुळे असहकार आंदोलन थांबविण्यात येते. या घटनेचा पुनरुच्चार एकांकिकेतून करण्यात आला आहे. ‘लढाईमध्ये ज्याचे त्याचे शस्त्र वेगळे असते’ असे सांगत गांधीजींचे अनुयायी हिंसाचाराबद्दल माफी मागतांना दिसतात.

राम मोहम्मद सिंग आझाद (सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्ट्स, नाशिक)

राम मोहम्मद सिंग आझाद’ ही एकांकिका जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारलेली असून यात बैसाखीनिमित्त रौलेट कायद्याच्या विरोधात सभेला उपस्थित राहिलेल्या भारतीयांचे निर्घृण हत्याकांड करण्यात आले. हत्याकांडाचा साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शींना या घटनेविषयी काय वाटते, ते या हल्ल्याचा प्रतिकार कसा करतात, याचे दर्शन ‘राम मोहम्मद..’ मधून घडते. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी क्रांतीला पर्याय नाही. या ध्येयाने प्रेरित झालेले स्वातंत्र्यप्रेमी, त्यांनी केलेला त्याग, प्राणांची दिलेली आहुती सर्वश्रृत असली तरी आजही काही चेहरे इतिहासात दडपले गेले आहेत. जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी झालेली क्रांती, गदर पार्टीची स्थापना या प्रसंगांची पेरणी एकांकिकेत करण्यात आली आहे. जालियानवाला हत्याकांडाचा प्रतिशोध घेण्यासाठी उधमसिंग या Rांतिकारकाने इंग्रज अधिकाऱ्याची केलेली हत्या, यावर भाष्य करतांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी जात, धर्म विसरून एकजूट यासाठी कशी महत्वाची ठरली, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

रात्र वैराची (श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यलय, धुळे)

‘रात्र वैराची’ एकांकिकेतून ग्रामीण भागातील बोलीभाषेचा लहेजा उचलत ग्रामीण जीवन, त्यांच्यावर अंधश्रध्देचा असलेला पगडा दाखवतांना बलात्कारीत मुलीच्या आईची व्यथा यावर बोट ठेवण्यात आले आहे. एकांकिका एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रसंगावर भाष्य करते. गावातील अमानुष माणसांच्या भीतीने जंगलात येऊन राहिलेली आई गावकऱ्यांविषयी ‘जनावरांची भीती नाय साहेब, पण आता माणसाची भीती वाटायला लागली हाय’ असे सांगते. तेव्हां बलात्कारीत माणसाच्या विकृतीचे ओंगळवाणे दर्शन होते. आईचे आयुष्य सुधारण्यासाठी म्हणून  पुढे आलेला मदतीचा हात ती नाकारते. माझ्या मुलीवर आलेला प्रसंग पुन्हा कोणावर नको हे गाऱ्हाणं ती मदतकर्त्यांकडे घालते.

मी-टू (लोकनेते व्यंकटराव हिरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पंचवटी)

ग्रामीण भागातून मुंबईसारख्या मोठय़ा शहरात आलेल्या तरुण लेखकाची आर्थिक ओढाताण, उच्च जीवनशैली जगण्याच्या इच्छेमुळे कौटुंबिक नात्यांकडे होणारे दुर्लक्ष या वर्तमानकालीन समस्या या एकांकिकेतून दाखविण्यात आल्या आहेत. चंदेरी दुनियेमागचा काळा चेहरा, त्यातील अस्थिरता यावर एकांकिका बोट ठेवते. सिनेक्षेत्राची ओढ असलेली तरुणी बंधनात अडकू नये यासाठी लिव्ह इनचा पर्याय स्वीकारते. परंतु, त्यातून अपेक्षित स्थैर्य लाभत नाही. अशा अनेक प्रसंगातून आजच्या तरुणांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न एकांकिकेतून करण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील खोटय़ा भावनांना मी टू म्हणतांना आयुष्यातील जवळच्या व्यक्तींच्या सुख दु:खात सहभागी होणे विरळ होत चालले आहे, हे ज्वलंत सत्य एकांकिकेद्वारे मांडण्यात आले आहे.

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.