गोदा प्रदूषणाविषयी प्रशासनाचे ‘झोपेचे सोंग’, सांडपाणीही थेट गोदापात्रात 

नाशिक :  महानगरपालिका ‘हरित नाशिक सुंदर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी किती सक्रिय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना गोदापात्रातील जलपर्णीचे वाढते साम्राज्य पाहता प्रशासनाची अनास्था ठळकपणे नजरेत भरते. गोदा प्रदूषणाविषयी १० वर्षांत वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवूनही प्रशासन ‘झोपेचे सोंग’ घेऊन आहे. सद्य:स्थितीत गोदापात्रात जलपर्णी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या असून गोदा प्रदूषणाचा मुद्दाही गंभीर आहे.

अशा स्थितीत फेब्रुवारी महिन्यात त्र्यंबकेश्वर येथून सुरू होणाऱ्या जलयात्रेत सहभागी जलप्रेमींसमोर शहराची काय प्रतिमा जाणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नाशिकचे सांस्कृतिक-धार्मिक वैभव असलेली गोदावरी नदी त्र्यंबकमधून उगम पावते. धार्मिकदृष्टय़ा गोदावरी स्नानाला विशेष महत्त्व आहे. याशिवाय गोदातीरावर श्राद्ध विधी सुरू असतात. यानिमित्ताने भाविकांची मांदियाळी भरत असताना आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतीतून प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे सांडपाणी थेट गोदापात्रात सोडले जात आहे. सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून दूषित पाण्यातील रासायनिक घटकांमुळे बीओडीची पातळी वाढत जाऊन प्राणवायूस बाधक असलेली जलपर्णी मोठय़ा प्रमाणावर वाढण्यास मदत होत आहे.

या विरोधात काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने याविषयी पावले उचलण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, गोदा प्रदूषणाबाबत गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली. गोदा प्रदूषण मुद्दा तापत असताना महापालिकेने ठेकेदाराच्या मार्फत पाणवेली काढण्याविषयी आश्वस्त केले असले तरी सांडपाणी जलपात्रात सोडायचे आणि त्यामुळे फोफावणाऱ्या पाणवेली काढण्याचे कंत्राट ठेकेदारांना द्यायचे, अशा पद्धतीने महापालिकेचे काम सुरू आहे.

वास्तविक गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी लाखो रुपयांचे ठेके देऊनही गोदावरी प्रदूषित आहे. रामवाडी पुलाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणात पाणवेली वाढलेली आहे. पाणवेली काढण्यासाठी महापालिकेची भिस्त ठेकेदारावर असली तरी अद्याप पाणवेली आहे तशाच आहेत. हेच दूषित पाणी रामकुंड परिसरात जाते. ज्या ठिकाणी देश- विदेशातील भाविक हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात किंवा सोबत नेतात. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य उदासीन कारभारामुळे नाशिककरांसह भाविकांच्या जिवाशी खेळ होत आहे.

याविषयी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे यांनी प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदीमध्ये मोठय़ा प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या गटारीमुळे जलप्रदूषण वाढत असल्याची तक्रार केली. गटारींच्या पाण्यात नायट्रोजन असल्यामुळे पाणवेलींचे खाद्य या गटारी आहेत. नदीपात्रात गटारी सोडायच्या आणि पात्रात वाढलेल्या पाणवेली काढण्याचे ठेके देण्यात नाशिककरांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.