नाशिक महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपात झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांच्या चित्रफितींवरून शिवसेनेसह सर्व विरोधकांनी भाजपला खिंडीत गाठले आहे. भाजपला नाशिकमध्ये मात्र या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागत आहे. नोटाबंदी, कांद्यासह कृषिमालाचे कोसळलेले भाव, गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्ती व त्यांच्या नातलगांना दिलेली उमेदवारी, सत्ताधारी मित्रपक्षातील कलगीतुरा आदी मुद्दे प्रचारात आळवले जात आहेत. नेत्यांच्या घराणेशाहीमुळे निष्ठावंतांमधील अस्वस्थता आणि काही जागांवरील बंडखोरी राजकीय पक्षांची कसोटी पाहणार आहे.

नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात आहे.  अंतर्गत घोळामुळे एकाही प्रमुख राजकीय पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत. स्वबळावर सत्ता हस्तगत करण्यासाठी घाऊक पक्षांतर घडविण्याचा विक्रम सेना-भाजपने केला होता, परंतु तिकीट वाटपानंतर उसळलेला क्षोभ शमवताना त्यांच्या नाकीनऊ आले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मनसे वगळता एकाही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे धाडस दाखविले नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचा निर्णयही अखेरच्या क्षणी झाला. भाजप व शिवसेनेने थेट एबी फार्म देऊन आपल्या उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणण्याच्या कृतीचा दोन्ही पक्षांना फटका बसला. एबी फार्मच्या गोंधळामुळे दहा अधिकृत उमेदवारांना सेना पुरस्कृत म्हणून राहण्याची वेळ आली. या सर्वाना एकच पक्षचिन्ह मिळावे म्हणून केलेली धडपड व्यर्थ ठरली. वेगवेगळे चिन्ह घेऊन लढणारे पुरस्कृत उमेदवार नंतर साथ देतील की नाही, याची सेनेला भ्रांत आहे. भाजपची वेगळी स्थिती नाही. एक-दोन जागांवर त्यांना पुरस्कृत उमेदवार द्यावे लागले. डावलल्या गेलेल्यांनी तिकीट वाटपात मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप केले. शिवाय पक्षातील कथित व्यवहारांच्या ‘स्टिंग ऑपरेशन’ने विरोधकांना आयते कोलीत मिळाले. नाराजांनी केलेल्या आरोपांना जणू पुष्टी देणाऱ्या चित्रफितींवरून भाजपविरुद्ध कारवाईची मागणी शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने लावून धरली आहे. सर्व उमेदवारांचा सामूहिक पक्ष खर्च म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेण्यात आल्याची कबुली पक्षाने निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात दिली आहे. हा ‘डाग’ धुऊन काढण्यात भाजपला आपली शक्ती खर्च करावी लागत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

गुन्हेगार व त्यांच्या नातलगांना उमेदवारी देण्यात कोणताही पक्ष मागे राहिलेला नाही, परंतु गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने या प्रश्नावरून सर्वपक्षीयांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजप, सेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आपापल्या जाहीरनाम्यांतून आश्वासनांचा वर्षांव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना फलकावरून अंतर्धान पावलेले छगन भुजबळ यांचे छायाचित्र राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात अवतरले. कारागृहात असणारे माजी खासदार समीर भुजबळ यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये स्थान देण्यात आले. एकत्रितपणे लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे जाहीरनामे मात्र वेगवेगळे आहेत. गतवेळी राज यांनी विभागनिहाय प्रचारसभा घेऊन संपूर्ण नाशिक पिंजून काढले होते. यावेळी मनसेच्या उमेदवारांना स्वत:लाच आपल्या प्रचाराची धुरा वाहावी लागत आहे. मनसे नाशिकमध्ये झालेल्या विकासकामांची महती राज्यात गात असताना त्याचा नाशिकमधील नवख्या उमेदवारांना कितपत लाभ होईल, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

भाजप-सेनेची प्रतिष्ठा पणाला

महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यपातळीवर मित्रपक्षांमध्ये चाललेल्या चिखलफेकीचे प्रतिबिंब स्थानिक प्रचारातही उमटले. विरोधी पक्षांनी तो प्रचाराचा मुद्दा बनविला. मनसे पाच वर्षांतील विकासकामांचे विपणन करत आहे. गतवेळी शिवसेनेसोबत असणाऱ्या रिपाइंला (आठवले गट) यंदा भाजपने वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे या गटाला काही जागांवर स्वतंत्रपणे लढावे लागले.

घराणेशाहीची पताका

सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाही जोपासली असून त्यात भाजप अव्वलस्थानी आहे. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा मुलगा मच्छिंद्र, आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते यांचा मुलगा प्रथमेश, माजी उपमहापौर व  स्थायी समितीचे माजी सभापती यांची कन्या हिमगौरी आहेर-आडके, नगरसेवक दिनकर पाटील यांचा मुलगा अमोल, शिवसेनेचे नेते बबन घोलप यांच्या कन्या नयना आणि तनुजा, माजी महापौर विनायक पांडे यांची वहिनी कल्पना पांडे, माजी महापौर दशरथ पाटील यांचा मुलगा प्रेम अशी घराणेशाहीची बरीच मोठी यादी आहे. नेत्यांच्या घराणेशाही विरोधात काही प्रभागांत पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत आव्हान निर्माण केले.

अशाही लढती

महापालिका निवडणुकीत शंभरहून अधिक आजी-माजी नगरसेवक आपले नशीब अजमावत आहे. त्यातील विद्यमान ४५ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. ऐनवेळी उडय़ा मारणाऱ्यांकडे मतदार कसे पाहतात तेदेखील निवडणुकीत स्पष्ट होईल. एका प्रभागात काका-पुतण्यात अर्थात दोन पिढय़ांमध्ये लढत, तर काही प्रभागांत काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे अशी अफलातून युती उमेदवारांनी आकारास आणली आहे.