नाशिकमध्ये महानगपालिका निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची धुळवड अंतिम टप्प्यात आली असून आता नाशिककरांना दिग्गज नेत्यांच्या सभांचे वेध लागले आहेत. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर एकापाठोपाठ होत असलेल्या राजकीय सभांवरून त्याचा प्रत्यय येत आहे. काल याठिकाणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. सलग तीन दिवस या मैदानावर सभा होण्याची ही पहिलीच वेळ असून या सर्व पक्षांतील तळागाळातील कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना या सभांचे वेध लागले आहेत.
या मैदानावरील आजवरच्या सभा गाजल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. प्रामुख्याने तिन्ही ठाकरेंच्या सभा विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी गाजल्या आहेत. निवडणुकीत प्रचाराची तोफ डागण्यासाठी भाजपनेही हे मैदान निवडले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांच्या सभांनी हे मैदाने दणाणून जाणार असल्याने नाशिककरांना या सभांबद्दल उत्सुकता लागली आहे. यापूर्वी, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आ. मृणाल गोऱ्हे, यांच्या तर राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या सभा झाल्या आहेत. काँग्रेसच्या प्रचारार्थ रविवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा होणार आहे. परंतु त्यांच्या सभेचे स्थळ अजूनही निश्चित झालेले नाही. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मातब्बर नेत्यांमधील राजकीय धुळवडीचा नवीन अंक नाशिककरांना पहावयास मिळणार आहे. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप, चिखलफेक, आतापर्यंतच्या राजकीय परिस्थितीची उजळणी, एकमेकांनी उणीदुणी आणि वाकयुद्धाची आतषबाजी येत्या तीन दिवसांत या मैदानावर पाहायला मिळणार आहे.


भाजपातील आर्थिक देवाणघेवाणीबद्दलच्या व्हायरल झालेले व्हिडिओ, शिवसेनेतील दोन मातब्बर नेत्यांमधील शाब्दिक युद्ध आणि हाणामारी, विकासाच्या गप्पा, नोटाबंदी, शेतकरी कांदा प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिवछत्रपती स्मारक, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन, राजू शेट्टी यांचा पक्षाचा नाशिकसह इतर ठिकाणी शिवसेनेला बिनशर्त पाठींबा, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, समीर भुजबळ, देविदास पिंगळे प्रकरण, नकली नोटा छापणारा छबू नागरे अशा विविध मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहणार आहे.  एकीकडे विविध राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांसाठी रोड शो, सभा, मेळावे अशा विविध माध्यमातून तयारी करत असताना जे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे आहेत ते प्रचारासाठी एकटेपणे खिंड लढवत आहेत.