03 June 2020

News Flash

नाशिक, मालेगाव महापालिका लाल क्षेत्रात

उर्वरित जिल्हा बिगर लाल क्षेत्रात, टॅक्सी, रिक्षा वाहतुकीला लाल क्षेत्रात प्रतिबंध,

संग्रहित छायाचित्र

उर्वरित जिल्हा बिगर लाल क्षेत्रात, टॅक्सी, रिक्षा वाहतुकीला लाल क्षेत्रात प्रतिबंध,  दोन्ही क्षेत्रांत काही निर्बंध

नाशिक : जिल्ह्य़ातील मालेगाव, नाशिक महापालिका हद्दीचा परिसर लाल तर उर्वरित संपूर्ण ग्रामीण भाग बिगर लाल क्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. करोनाचे आतापर्यंत मालेगाव महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६६१, नाशिक महापालिका क्षेत्रात ४८, तर उर्वरित ग्रामीण भागात १११ रुग्ण आढळले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवितांना लाल आणि हिरव्या क्षेत्रातील जिल्ह्य़ांची यादी प्रसिध्द केली. केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार या दोन्ही क्षेत्रात वेगवेगळे निर्बंध, निकष लागू होतात. नाशिक जिल्ह्य़ाचा समावेश लाल क्षेत्रात असल्याने दैनंदिन व्यवहार, अर्थकारणास निर्बंधामुळे काही बाधा येईल काय, याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता होती. त्याचे निराकरण या वर्गीकरणामुळे होणार आहे.

मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्र बिगर लाल क्षेत्रात वर्गीकृत करण्यात आले. लाल आणि बिगर लाल क्षेत्रासह प्रतिबंधित क्षेत्रात लागू असणाऱ्या बाबींचा तपशील प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार प्रतिबंधित असलेली क्रीडांगणे ग्रामीण भागात खेळण्यासाठी खुली करता येतील.

बिगर लाल क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थिती म्हणजे ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करता येतील. खासगी आस्थापना, कार्यालये उघडता येतील. शहराप्रमाणे ग्रामीण भागात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लाल क्षेत्रात मद्य घरपोच वितरित करण्याची मुभा देण्यात आली असून ग्रामीण भागात तो निकष नाही.

लाल आणि बिगर लाल क्षेत्रात हवाई, रेल्वे, मेट्रो बंदच राहणार असून आंतरराज्य वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणच्या शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.

लाल क्षेत्रात टॅक्सी, रिक्षा वाहतुकीला प्रतिबंध असला तरी बिगर लाल क्षेत्रात एक चालक आणि दोन प्रवासी या निकषानुसार वाहतुकीला मुभा आहे. खासगी बांधकामे करता येतील. शेतीशी संबंधित कामे करता येतील. बँक, वित्तीय संस्था, कुरिअर, टपाल, वैद्यकीय आपत्त्कालीन वाहतूक दोन्ही ठिकाणी सुरू राहील. हॉटेलवाले केवळ घरपोच पदार्थ देऊ शकतात.

अनेक तालुक्यांना दिलासा

मालेगाव, नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित १३ तालुके बिगर लाल क्षेत्रात समाविष्ट झाल्याने काही निर्बंधातून त्यांची मुक्तता होईल. नाशिक, मालेगाव तालुक्यातील शहरी क्षेत्र वगळता उर्वरित भागास या वर्गवारीने काहिसा दिलासा मिळेल. ग्रामीण भागात मुख्यत्वे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने शेतीच्या मशागतीची कामे प्रगतीपथावर आहेत. ग्रामीण भागात उद्योगधंदे, औद्योगिक वसाहती मोठय़ा प्रमाणात आहेत. येवल्यात ३३, तर मालेगाव ग्रामीणमध्ये १७, निफाड तालुक्यात १६ रुग्ण आढळले. नांदगाव, दिंडोरी, सिन्नर, चांदवड, नाशिक ग्रामीण, कळवण, सटाणा या तालुक्यात हे प्रमाण एक ते नऊच्या दरम्यान आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामीण अर्थचक्र गतिमान करण्यास या वर्गीकरणाने हातभार लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 4:09 am

Web Title: nashik malegaon municipal corporation in red zone zws 70
Next Stories
1 खते, बियाणे, पीक कर्ज थेट उपलब्ध करणार
2 दीड हजार बसगाडय़ांतून ३४ हजार मजुरांची पाठवणी
3 मॉल, उद्योग, उर्वरित दुकाने केवळ पावसाळापूर्व कामांसाठीच उघडणार
Just Now!
X