जिल्ह्य़ातील मालेगाव, नाशिक महापालिका हद्दीचा परिसर लाल तर उर्वरित संपूर्ण ग्रामीण भाग बिगर लाल क्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. करोनाचे आतापर्यंत मालेगाव महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ६६१, नाशिक महापालिका क्षेत्रात ४८, तर उर्वरित ग्रामीण भागात १११ रुग्ण आढळले आहेत. करोनाच्या तीव्रतेच्या आधारे प्रशासनाने लाल आणि बिगर लाल क्षेत्राचे नव्याने वर्गीकरण केले. यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार गतिमान होण्यास अधिक चालना मिळणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबतचे आदेश काढले. राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवितांना लाल आणि हिरव्या क्षेत्रातील जिल्ह्य़ांची यादी प्रसिध्द केली. केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार या दोन्ही क्षेत्रात वेगवेगळे निर्बंध, निकष लागू होतात. नाशिक जिल्ह्य़ाचा समावेश लाल क्षेत्रात असल्याने दैनंदिन व्यवहार, अर्थकारणास निर्बंधामुळे काही बाधा येईल काय, याबद्दल अनेकांच्या मनात साशंकता होती. त्याचे निराकरण या वर्गीकरणामुळे होणार आहे. मालेगाव आणि नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्र बिगर लाल क्षेत्रात वर्गीकृत करण्यात आले. लाल आणि बिगर लाल क्षेत्रासह प्रतिबंधित क्षेत्रात लागू असणाऱ्या बाबींचा तपशील प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार प्रतिबंधित असलेली क्रीडांगणे ग्रामीण भागात खेळण्यासाठी खुली करता येतील.