01 March 2021

News Flash

संयुक्त ‘मॅरेथॉन’साठी जोरदार प्रयत्न

नाशिक मविप्र मॅरेथॉन जानेवारीमध्ये तर नाशिक पोलीस मॅरेथॉन फेब्रुवारी महिन्यात होत असते.

नाशिक मविप्र मॅरेथॉनच्या पदकाचे अनावरण करताना नीलिमा पवार, नाना महाले, सचिन पिंगळे आदी.

खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी शहर पोलिसांना प्रस्ताव; मविप्रची रविवारी, तर फेब्रुवारीत पोलिसांची मॅरेथॉन

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या वतीने यंदा रविवारी सकाळी पाचवी राष्ट्रीय आणि दहावी राज्यस्तरीय त्यानंतर पुढच्या महिन्यात नाशिक पोलीस मॅरेथॉन शर्यत होत आहे. काही अंतराने होणाऱ्या या शर्यतीत खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी ही ‘मॅरेथॉन’ एकत्रित घेण्याचा प्रस्ताव  मविप्र समाज शिक्षण संस्थेने पोलीस आयुक्तालयासमोर ठेवला आहे. या संदर्भातील माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली.

नाशिक मविप्र मॅरेथॉन जानेवारीमध्ये तर नाशिक पोलीस मॅरेथॉन फेब्रुवारी महिन्यात होत असते. यंदाही तिचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही मॅरेथॉनसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.  खुल्या राष्ट्रीय गटासाठी ४२.१९५ किलोमीटर तर इतर गटांसाठी त्याहून कमी अंतर आहे. मॅरेथॉन शर्यतीत रस्त्यावर खेळाडूंच्या सुरक्षितेतची काळजी घ्यावी लागते. शहर पोलीस या उपक्रमात सहभागी झाल्यास मार्गावर कोणतीही वाहने येणार नाही याची अधिक दक्षता घेणे शक्य होईल. शिवाय दोन्ही मॅरेथॉनमध्ये फारसे अंतर नसल्याने धावपटूंची दमछाक टाळता येईल. या बाबी लक्षात घेऊन मविप्र शिक्षण संस्थेने पोलीस आयुक्तांना या संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे.  या स्पर्धा कायमस्वरुपी एकत्रितपणे घेण्याची तयारी मविप्रने दर्शविली आहे.

दरम्यान, रविवारी होणारी मविप्र मॅरेथॉन शर्यत १७ गटात होणार असून विजेत्या खेळाडूंना एकूण सात लाख २३ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. शर्यतीत आठ गट हे संस्थांतर्गत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे असून उर्वरित सात गट राज्यातील विविध जिल्ह्य़ातील आणि नाशिक जिल्ह्य़ातील खेळाडूंसाठी खुले आहेत. तसेच १८ वर्षांआतील दोन गट जिल्ह्य़ातील इतर खेळाडूंसाठी राहतील.

शर्यतीची सुरूवात गंगापूर रस्त्यावरील मविप्र मॅरेथॉन चौकातून होईल. नंतर गंगापूर रोडमार्गे, विद्या विकास चौक, आनंदवली, सोमेश्वर, दुगांव फाटा, गिरणारे, धोंडेगाव आणि परत मविप्र मॅरेथॉन चौक असा राहील. निरीक्षक म्हणून अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ए. मुरलीधरन, प्रा. दिनेश भालेराव उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता पारितोषिक वितरण सोहळा ऑलिम्पियन दत्तु भोकनळ यांच्या हस्ते होणार आहे. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम होईल.

खुल्या राष्ट्रीय गटासाठी तीन लाख ५४ हजार तर उर्वरित १५ गटांसाठी तीन लाख ६९ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि वृक्षांच्या पानांचा मुकुट देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येईल. आतापर्यंत तीन हजार जणांनी नोंदणी केल्याची माहिती पवार यांनी दिली. बाहेरगावहून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आली आहे.

तसेच वैद्यकीय पथक मार्गावर तैनात राहील. ४० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेकडून सहकार्य घेण्याचे प्रयत्न

एक जानेवारी १९९४ पासून सुरू झालेल्या मॅरेथॉनला खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळत असला तरी प्रायोजक मिळत नसल्याची बाब पुन्हा समोर आली. यामुळे पारितोषिकांच्या रकमेत वाढ करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन मविप्र संस्थेने महापालिकेसह शहर परिसरातील बडय़ा कारखान्यांना साद घातली आहे. महापालिकेतर्फे महापौर चषकाचे आयोजन केले जाते. मागील काही वर्षांपासून त्याचे आयोजन करणे पालिकेला शक्य झाले नाही. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेने महापालिकेच्या सहकार्याने एनकेपीएल कबड्डी लीगचे आयोजन केले. मविप्र मॅरेथॉनसाठी महापालिकेने आर्थिक सहकार्य करावे, असा प्रस्ताव संस्था पाठविणार असल्याचे नीलिमा पवार यांनी सांगितले.

गटनिहाय अंतर

  • खुला गट पूर्ण मॅरेथॉन (पुरूष) – ४२.१९५ किलोमीटर
  • अर्थ मॅरेथॉन (पुरुष) – २१.०९७ किलोमीटर
  • खुला गट महिला आणि ४५ वर्षांवरील पुरूष – १० किलोमीटर
  • ३५ वर्षांवरील महिला – पाच किलोमीटर
  • ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) – चार किलोमीटर
  • ७५ वर्षांवरील पुरुष – तीन किलोमीटर
  • १८ वर्षांआतील मुले-मुली – सहा किलोमीटर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:39 am

Web Title: nashik marathon 2018 nashik police security
Next Stories
1 नववर्षांत तापमानाचा पारा उतरला
2 दगडफेक, रास्ता रोको, मोर्चा
3 ‘समृद्धी’साठी ९८ टक्के मोजणी पूर्णत्वास
Just Now!
X