शेतमाल वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये निर्माण झालेल्या भाजीपाला तुटवडय़ावर मात करण्यासाठी सुटीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जाणारे सर्व महामार्ग शेतमाल व दुधाच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्ताद्वारे सुरक्षित करण्यात आले असून मागील चोवीस तासात १९४ मालमोटार व टँकर मुंबईसह राज्यातील इतर भागात पाठविण्यात आले आहेत.

शनिवारी जिल्ह्यातील एकंदर स्थितीची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अंकुश शिंदे यांनी दिली. शेतमालाची अडवणूक व नासधूस करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केल्यामुळे स्थिती नियंत्रणात आली असून शनिवारी सर्वत्र शांतता राहिल्याचे उभयतांनी सांगितले. शेतमाल वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. शेतमाल वाहतूक करण्यासाठी व्यापारी व शेतकरी या कक्षाशी संपर्क साधत आहेत. मागील चोवीस तासात बंदोबस्तात कांद्याचे ११ कंटेनर, आंब्याच्या २२ मालमोटारी, दुधाचे ३० टँकर आदी १९४ वाहने राज्यातील इतर ठिकाणी व गुजरातमध्ये रवाना करण्यात आले. कृषिमाल विक्री करावयाची इच्छा असणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यास बंदोबस्त दिला जाईल. पोलीस संरक्षणाशिवाय वाहने नेऊ नयेत आणि वाहनधारकांनी मुख्य महामार्ग वगळता आडवळणाच्या रस्त्याने जाऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले. शेतमाल पुरवठा सुरळीत करण्यासाठी सकाळी व्यापारी, शेतकरी उत्पादक संघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक आदींशी सकारात्मक बैठक पार पडली. शासनाच्या आश्वासनांवर ज्या घटकांचे समाधान झालेले नाही, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. परंतु, कोणी कायदा हाती घेण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले. सकाळी नाशिक शहरात दुधाचे ११ टँकर आले असून रविवारी परिस्थितीत आणखी सुधारणा होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

बघ्याची भूमिका घेणारे चार पोलीस निलंबित

संप काळात कृषिमालाची नासधूस होत असताना कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच काळात कर्तव्यात कसूर केल्यावरून काही गावातील तलाठय़ांना निलंबित केले जाणार आहे. गावातील परिस्थितीची माहिती योग्य पध्दतीने न देणाऱ्या पोलीस पाटलांवरही कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात आंदोलकांनी टँकरमधील दूध ओतून दिले. बंदोबस्तावरील पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही.

याची गंभीर दखल घेत संबंधित चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. काही ठिकाणी आंदोलकांकडून मालाची लूट झाली. वडनेर खाकुर्डी येथे १५० गव्हाचे पोते संशयितांकडून जप्त करण्यात आले. इतरत्र झालेल्या अशा घटनांमधील मुद्देमालही हस्तगत केला जात आहे.